डोंबिवली : जनसंघाचे माजी नगरसेवक तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हरिहर कांत उर्फ कांतबाबू (९०) यांचे कोरोनामुळे सोमवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंड असा परिवार आहे.
साधारण १९६० पासून ते जनसंघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी होते. त्याच कालावधीत ते पक्षाचे नगरसेवक झाले. नंतर भाजपच्या असंख्य नगरसेवक, आमदार, खासदार यांना त्यांनी मार्गदर्शन केले. पक्षाच्या जिल्हास्तरीय तसेच कल्याण डोंबिवलीमधील बालेकिल्ला टिकवून ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
कार्यकर्ता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कांतबाबू. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी पक्षाचे काम केले. युवा कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेवून नि:स्पृहपणे कार्यरत राहावे, अशा शब्दांत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांना आदरांजली वाहिली. माजी मंत्री जगन्नाथ पाटील म्हणाले, आमच्या काळातले ज्येष्ठ आणि कर्मठ कार्यकर्ते कांतबाबू यांचे निधन झाल्याने पक्षाने सच्चा कार्यकर्ता गमावला आहे. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह पक्षाचे माजी नगरसेवक, कार्यकर्ते आदींनी दुःख व्यक्त केले आहे.
--------