मीरारोड - भाजपाच्या माजी महापौर तथा आमदार नरेंद्र मेहतांना शह देण्यासाठी मैदानात उतरलेल्या गीता जैन यांनी शहरात स्वतःच्या छायाचित्रा सह " धर्मस्थापनार्थ " या शब्दाचे लावलेले मोठमोठे फलक सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. आ. मेहता समर्थकां कडून यावर टीका केली जात आहे तर त्यांच्या विरोधकां कडून मात्र शहरात अधर्म वाढल्याचे जैन यांनीच मान्य केल्याचा सूर लावत मेहतांना लक्ष्य केले आहे .
मागील पालिका कार्यकाळात गीता जैन या महापौर होत्या . तेव्हा पासूनच त्यांचे आमदार नरेंद्र मेहतांशी खटके उडत होते . जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचा वा गैरप्रकाराचा ठपका नसताना दुसरी कडे आ . मेहता मात्र नेहमीच विविध कारणांनी वादाच्या वर्तुळात राहिले . परंतु ऑगस्ट २०१७च्या पालिका निवडणुकीत अन्य पक्षातल्या दिग्गजांना भाजपात आणून आ . मेहतांनी भाजपाला एकहाती सत्ता मिळवून दिली . त्या मुळे मीरा भाईंदर मध्येच नव्हे तर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या दरबारात देखील मेहतांचे मोठे वजन आहे . आज पालिकेतले पान मेहतांशिवाय हलत नाही . महसूल , पोलीस आदी शासकीय खात्यांवर देखील त्यांचा दबदबा मानला जातो .
मात्र त्याच बरोबर लाच घेताना मेहतांना पकडल्याचा उच्च न्यायालयात सुरु असलेला खटला , लोकायुक्त यांनी लावलेली लाच लुचपत प्रतिबंधक विभागा कडून चौकशी , ७११ रुग्णालयातील पालिकेच्या जागेचे हस्तांतरण , अपना घर योजना व महसूल विभागाचा ७५ कोटींचा दंड , टेक्निकल शाळेच्या आरक्षणातील सेव्हन स्क्वेअर शाळा , पर्यावरणाचा ऱ्हास , टीडीआर आदी एक ना अनेक प्रकरणात आ . मेहता वादाच्या भोवऱ्यात आहेत .
शिवाय पालिकेत आणले जाणारे प्रस्ताव व ठराव , वाढलेली अनधिकृत बांधकामे , विकास आराखडा , टेंडर अश्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप होत आहेत . त्यातच माजी महापौर गीता जैन यांनी आ. मेहतां विरोधात दंड थोपटत मीरा भाईंदर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे . मेहता सतत मुख्यमंत्र्यांना आणतात तर जैन यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता यांच्या पासून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी अन्य भाजपातील दिग्गज मंडळींना आणून मेहतांना आपण पण कच्चे नसल्याचे दाखवून दिले आहे .
जैन यांच्या कार्यक्रमाला जायचे नाही असे फतवे काढण्या पासून महासभेतल्या काही ठरावां वरून जैन यांना पक्षा मार्फत नोटिसा बजावणे आदी प्रकार सुरु आहेत . त्यातच गीता जैन यांचे शहरात ठिकठिकाणी लहान मोठे होर्डिंग लागले आहेत . त्या होर्डिंगवर जैन यांचे छायाचित्र असून वर ठळक पणे धर्मस्थापनार्थ असे लिहले आहे .
सध्या हे होर्डिंग सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत . धर्मस्थापनार्थ म्हणजे नेमके काय ? याचा अर्थ काय ? या मागचा हेतू काय ? असे प्रश्न नागरिकांसह राजकारण्यांना देखील पडले आहेत . सोशल मीडियावर देखील यावर काथ्याकूट सुरु आहे . काहीजण धर्मस्थापनार्थ हि काय नवीन भानगड आहे म्हणून विचारतात . तर काही जण केवळ चर्चेत राहण्यासाठी किंवा आ . मेहतांना डिवचण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे बोलतात .
विरोधी पक्षातील मंडळीं सह काही सामाजिक संस्था वा जागरूक नागरिकांच्या मते भाजपाची एकहाती सत्ता आली तेव्हा पासून शहरात अधर्म वाढल्याने आता धर्मस्थापने ची नितांत गरज निर्माण झाल्याचा अर्थ सांगतात . शहरात बेकायदा बांधकामे फोफावली , विकासकांना फुटाची आकडे मोड करावी लागत आहे , टेंडर - टक्केवारी , मानी कारभार , आर्थिक व राजकीय हित पाहून नियमबाह्य प्रस्ताव व ठराव असे एकनाही अनेक कारणं शहरात अधर्म वाढण्यास कारणीभूत असल्याची चर्चा देखील रंगली आहे .
गीता जैन ( माजी महापौर, भाजपा नगरसेविका ) - शहरात अधर्म वाढला कि नाही वाढला या हे मला माहित नाही . धर्मस्थापनार्थ याचा अर्थ खूपच सरळ आणि साधा आहे . आणि सर्वानाच तो समजणारा आहे . त्यामुळे शहरातील जागरूक नागरिकांची धर्मस्थापनार्थ बद्दल असलेली प्रतिक्रिया जाणून घेणे मला महत्वाचे आहे .
प्रशांत दळवी ( भाजपा नगरसेवक ) - धर्मस्थापनार्थ चा अर्थ जो तो आपल्या सोयी प्रमाणे लावत आहेत . विरोधीपक्ष हे त्यांच्या राजकीय सोयीने अर्थ काढत आहेत . ज्यांनी हे फलक लावले त्यांनाच त्याचा अर्थ काय घ्यायचा ते विचारा .
अनिल सावंत ( काँग्रेस जिल्हाध्यक्ष ) - शहरात भाजपाची एकहाती सत्ता आल्या पासून भ्रष्टाचार , अनागोंदी , मनमानी , दडपशाही बोकाळली आहे . सामान्य नागरिक करवाढ व नागरी समस्यांनी मेटाकुटीला आले आहेत . शहरात भाजपाच्या सत्तेत अधर्म प्रचंड वाढला असल्याने धर्मस्थापने ची तीव्र गरज निर्माण झाल्याचे गीता जैन यांनी एकप्रकारे मान्य केले आहे .
प्रताप सरनाईक ( आमदार , शिवसेना ) - भाजपाने भाईंदर मध्ये कत्तलखाना बांधण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे . या आधी जैन बांधवांची मतं मिळावी म्हणून कत्तलखाना होऊ देणार नाही सांगून आता त्यांची फसवणूक केली आहे . त्यामुळे धर्म स्थापनेची गरज गीता जैन यांनी होर्डिंग द्वारे व्यक्त केली असावी .