ठाणे : ठाण्याचे माजी महापौर, सीकेपी सोशल क्लब ठाणेचे अध्यक्ष मोहन गुप्ते यांचे शुक्रवारी पहाटे ठाण्यातील एका रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
मोहन गुप्ते हे मार्च १९९० ते मार्च १९९१ या काळात ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर, त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. १९८६ ते १९८८ या काळात ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेतेपदही त्यांनी भूषविले होते. कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे काम मार्गी लागण्यासाठी त्यांनी जातीने पुढाकार घेतला होता. त्यांच्या कारकिर्दीतही पालिकेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये वाद होता. त्यावेळी गुप्ते नेहमी लोकप्रतिनिधींची बाजू भक्कमपणे घ्यायचे. सीकेपी ज्ञातीगृह विश्वस्त मंडळाचे ते कार्यकारी विश्वस्तही होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि जावई असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा गणेशकुटी, नामदेववाडी, नौपाडा येथील राहत्या घरून रविवारी निघेल.