मीरारोड - भाजपा समर्थक आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याच्या कानशिलात मारल्या बद्दल भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी निषेध करत आ. जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर ७ दिवसाच्या नवजात मुलीला भर पावसात बेघर करणाऱ्या व बलात्कार, भ्रष्टाचार सह अनेक गंभीर गुन्हे असलेल्या कुख्यात लोकांना बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोला आ. जैन यांनी मेहतांना लगावला आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजपा आमदार नरेंद्र मेहतांना भाजपाच्या बंडखोर अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी पराभवाची धूळ चारली होती. आता आमदार जैन यांनी पालिकेच्या ठेक्यावरील कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांच्या कानशिलात लगावल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच मेहता हे आक्रमक झाले आहेत. मेहता अध्यक्ष असलेल्या भाजपा प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेने पालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन आ. जैन यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तर स्वतः आ. मेहतांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना आ . जैन यांचे कृत्य अत्यंत निंदनीय असल्याचे सांगून निषेध केला आहे. ३५३ खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे. लोकांमध्ये मारहाण करणे हे अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करते तर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे मनोबल वाढवते. आयुक्तांनी तातडीने कारवाई केली पाहिजे नाहीतर सर्व शहर अतिक्रमण होऊन जाईल. चिंता एवढीच आहे कि , एखाद्या आमदाराने आयुक्तांची तक्रार करू नये म्हणून आयुक्त स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांचा बळी देतात असे जनरली असते असे वक्तव्य मेहतांनी केले आहे.
मेहतांच्या वक्तव्यां वर आ . गीता जैन ह्या देखील आक्रमक झाल्या आहेत. भर पावसात पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खाजगी जागेतील घर तोडून ७ दिवसांच्या नवजात मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना बेघर करणाऱ्या, रखवालदाराने गाडी पुढे नेण्यास सांगितली म्हणून त्यास मारहाण करणाऱ्या, लोकांची जमिनी व्यवहारात फसवणूक करणाऱ्या, बलात्कार आणि भ्रष्टाचार सारखे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या कुख्यात व्यक्तीला माझ्या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. यांच्या गैरप्रकार आणि मनमानी दांडगाईची जंत्री लोकांना सुद्धा माहिती आहे अश्या शब्दात आ. जैन यांनी मेहतांवर पलटवार केला आहे.
मीरारोडचे व देशाचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे हे देशाच्या सीमेवर काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले तेव्हा संपूर्ण शहर व देश शोकमग्न असताना हेच नरेंद्र मेहता मीरारोडमध्ये जाहीर बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करत होते, असेही आमदार गीता जैन यांनी म्हटले.