मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या प्रशासकीय बैठकीत महापौरांसह शिरकाव करून माजी आमदारांनी सहभाग घेतल्या वरून शिवसेना, काँग्रेस, मनसे आदींनी टीकेची झोड उठवली आहे. आयुक्तांनीच माजी आमदारांसाठी बैठक बोलावल्याचा आरोप केला आहे. आयुक्तांनी मात्र प्रशासकीय बैठक सुरू असताना महापौर व माजी आमदार आले व बैठकीत सहभागी झाल्याचे मान्य करत बाकी आरोप फेटाळले आहेत.
मीरा भाईंदर महापालिका प्रशासनासह आयुक्त बालाजी खतगावकर यांचा कारभार हा तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांच्या कला नुसार चालत आलेला आहे. यातूनच बेकायदेशीर बांधकामांना दिले जाणारे संरक्षण, नियमबाह्य निर्णय, पर्यावरणाचा ऱ्हास , प्रशासकीय कामात नियमबाह्य सहभाग व हस्तक्षेप , गैरप्रकार आदी अनेक आरोप महापालिका आयुक्तांपासून प्रशासनावर होत आले आहेत. पालिकेत होणाऱ्या बैठकादेखील वादाचा विषय ठरल्या आहेत. मेहतांनी देखील पालिकेच्या कामातच जास्त रस दाखवला आहे.विधानसभा निवडणुकीत मेहतांचा पराभव झाल्याने ते आता आमदार नाहीत. तरी देखील आयुक्तांनी सोमवारी पालिका अधिकाऱ्यांची प्रशासकीय बैठक बोलावून त्यात मेहतांना सहभागी करून घेत बैठक चालवली. एक तासा पेक्षा जास्त चाललेल्या या बैठकीत मेहतांनीच बहुतांश बैठक चालवली असे पालिका सूत्रांनी सांगितले.
आयुतांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यात माजी आमदारांना सहभागी करून घेतल्या वरून मनसेच्या पदाधिकारी अनु पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. पालिका बैठकांत माजी आमदारांना सहभागी करून बैठक चालवणे म्हणजे आयुक्तांनी लोचटपणाचा कहर केल्याचे पाटील म्हणाल्या. आयुक्तांसह संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी देखील या प्रकारा बद्दल आश्चर्य व्यक्त केले असून प्रशासकीय बैठकीत असा प्रकार खपवून घेणे गंभीर असल्याचे म्हटले आहे. बैठकीत कलम 37 खाली फेरबदल, विकास कर वाढ आदी देखील विषय झाल्याची माहिती मिळाल्याचे जुबेर म्हणाले.
पालिकेतील शिवसेनेच्या कामगार सेनेचे पदाधिकारी श्याम म्हाप्रलळर यांनी, आयुक्त खतगावकरच प्रशासकीय कामाचा बाजार मांडत असून गैरप्रकारांना संरक्षणच नव्हे तर त्यात सहभागी आहेत असे म्हटले आहे. आयुक्तांच्या लोचटपणा मुळे पालिका प्रशासन एका नेत्याच्या दावणीला बांधले गेले आहे. आयुक्तां वर कारवाई झाली पाहिजे आणि अधिकाऱ्यांना बेकायदेशीर पणे अन्य कोणाच्या नावाने बोलावून बैठक, निर्देश देणे बंद करा अन्यथा सेनेला आपला हिसका दाखवू असा इशारा म्हाप्रळकर यांनी दिला आहे. आयुक्त खतगावकर यांनी मात्र आपण माजी आमदार वा महापौरांसाठी बैठक बोलावली नव्हती तर ती प्रशासकीय बैठक होती. प्रशासनाची बैठक सुरू असताना ते आले आणि सहभागी झाले . पण त्यात कोणाचे व्यक्तिगत नाही तर शहराचे विषय झाले असे आयुक्त म्हणाले.