ठाणे - मराठी ग्रंथ संग्रहालयाचे माजी अध्यक्ष तथा भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष साहित्यप्रेमी मा. य. गोखले यांचे आज सकाळी 11:30 वाजता राहत्या घरी निधन झाले आहे. 84 व्या मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
खऱ्या अर्थाने ठाण्याचे `माय गोखले'
ठाणे शहरातील बँकिंग, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्य वर्तुळातील एक आदरार्थी नाव म्हणजे मा. य. गोखले. ते खऱ्या अर्थाने ठाण्याचे माय गोखले होते. मा. य. गोखले यांच्याविषयी ठाणेकरांना आपुलकी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे भारत सहकारी बॅंकेने नेहमीच सचोटीने व्यवसाय करून बँकिंग क्षेत्रात मानाचे स्थान पटकावले आहे. ठाण्यात झालेले ८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. माय गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- निरंजन वसंत डावखरे, आमदार व जिल्हाध्यक्ष, भाजपा
मा. य. गोखले यांच्या निधनाने ठाण्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विश्वातील एक अग्रणी व चतुरस्त्र व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. सरकारी नोकरी सोडून ते बांधकाम व्यवसायात उतरले आणि सचोटी व चोख व्यवहाराच्या बळावर यशस्वी व विश्वासार्ह बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या ६०व्या वर्षानंतर एलएलबी व एलएलएम होऊन त्यांनी शिक्षणाला वयाचं बंधन नसतं हे दाखवून दिलं. सहकारी बँक कशी चालवावी, याचा मापदंड त्यांनी ठाणे भारत सहकारी बँकेच्या रुपाने निर्माण केला. ठाणे भारत सहकारी बँक ही मा. य. गोखले यांची बँक म्हणूनच ओळखली जाते, इतका गहिरा ठसा त्यांनी उमटवला. ठाण्याच्या सांस्कृतिक विश्वातही त्यांचं योगदान मोठं होतं. मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ते अध्यक्ष होते. ठाण्यात झालेल्या ८४व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. श्री. कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतासाठी चित्ररथांच्या माध्यमातून स्वागतयात्रेचं आयोजन करण्याची संकल्पना त्यांनी अनेक वर्षं यशस्वीपणे राबवली. विद्या प्रसारक मंडळाचे संचालक सदस्य म्हणून शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले. ठाण्याच्या सर्वांगीण विकासाशी आपल्या कर्तृत्वाने नाळ जोडलेले मा. य. गोखले यांच्या निधनाने ठाण्याची व ठाणेकरांची अपरिमित हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी व शिवसेना परिवार सहभागी आहोत.
- एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा
कुशाग्र बुद्धिमत्ता, चैतन्यशील वृत्ती, शिस्तबद्ध कार्यपद्धती असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले माय गोखले यांचे निधन मनाला चटका लावून जाते. व्यास क्रिएशन्सच्या स्थापनेपासून त्यांचा सहयोग, पाठिंबा, आशीर्वाद लाभला. सर्व उपक्रम, कार्यक्रम यांना त्यांची लाभलेली उपस्थिती मोलाची असे. बँकिंग क्षेत्राचा सखोल अभ्यासक आणि साहित्यिक हे त्यांचे वैशिष्ट्य. पाऊले चालती : एक जीवनानुभव या त्यांच्या आत्मकथनाची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्याचे भाग्य व्यास क्रिएशन्सला लाभले. गोखले सरांची कल्पकता, कामाची पद्धतशीर मांडणी, आखणी, नियोजन हा गुण साऱ्यांनीच आत्मसात करणं हीच त्यांना खर्या अर्थाने आदरांजली ठरेल.
- नीलेश गायकवाड, संचालक - व्यास क्रिएशन्स