कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पेणकर (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
पेणकर यांना यकृताचा आजार होता. त्यांचा लहान मुलगा प्रतीक याने त्यांना यकृत दिले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. सच्चा शिवसैनिक हरपल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
पेणकर यांनी कोरोनाकाळात रस्त्यावर उतरून काम केले. पेणकर यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. कल्याण रेल्वेस्थानकात त्यांनी किशोरवयात पेपरविक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर ते रिक्षाचालक होते. रिक्षा चालविताना त्यांनी १९७५ मध्ये रिक्षा चालक-मालकांची संघटना बांधली. कोकण रिजन रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघाचे ते अध्यक्ष होते. रिक्षाचालकांसाठी त्यांनी पतपेढी सुरू केली.
एका प्रभागातून ते चार वेळा नगरसेवकपदी निवडून आले होते. सुरुवातीला ते केडीएमसीच्या परिवहन समितीमध्ये सदस्य होते. त्यानंतर ते परिवहन समिती सभापती होते. त्यांच्या कार्यकाळात मनपाच्या परिवहन सेवेचा शुभारंभ झाला. पेणकर यांनी परिवहन कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्षपद तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्षपद भूषविले.
स्थायी सभापती, सभागृहपद यशस्वीपणे सांभाळले.
२०१३ मध्ये ते मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदी होते. त्यांना सभागृहपदही दिले गेले होते. अनेक पदे भूषवित असताना त्यांच्यातील सच्चा शिवसैनिक आणि कार्यकर्ता प्रत्येक वेळी अनेकांना पाहावयास मिळला. त्यांना नाना या नावाने संबोधले जात होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
---------------------