उल्हासनगर : उल्हासनगर नगरपालिकेत तीनवेळा नगराध्यक्ष राहिलेले प्रल्हाद अडवाणी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, नातवंडं असा मोठा परिवार आहे. अमेरिकेत त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
उल्हासनगरच्या विकासात मोठे योगदान राहिलेले ॲड. प्रल्हाद अडवाणी हे १ नोव्हेंबर १९६९ ते ३ फेब्रुवारी १९७०, २१ जुलै १९७० ते २० नोव्हेंबर १९७० व १ जुलै १९७८ ते ३१ मार्च १९८४ या कालावधीत तीन वेळा नगराध्यक्ष होते. त्यांच्या कालावधीत देशात पहिले सिमेंट काँक्रिट रस्ते बांधण्यास सुरुवात झाली. तसेच हिराघाट येथील प्रसिद्ध बोट क्लबची उभारणी केली. जनसंघाचे कट्टर कार्यकर्ते असणारे प्रल्हाद अडवाणी प्रसिद्ध वकील होते. कालांतराने मुले अमेरिकेत स्थायिक झाल्यावर तेही अमेरिकेत गेले. अल्पशा आजाराने बुधवारी त्यांचे निधन झाले.
आमदार कुमार आयलानी, महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, भाजपचे माजी शहराध्यक्ष लाल पंजाबी, प्रकाश कुकरेजा, राजेश गेमनानी, ओमी कलानी, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे, सभागृह नेते भारत गंगोत्री आदींनी प्रल्हाद अडवाणी यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले.