ठाणे : मला खूप आनंद होत आहे की, गेल्या दोन-तीन वर्षांत दर्जेदार मराठी चित्रपट येत आहेत. पूर्वी इतक्या चांगल्या फिल्म बनत नसत. किल्ला, कोर्ट, हाय वे हे तीन चित्रपट अतिशय वेगळे, चांगले व दर्जेदार आहेत. माझी मनापासून इच्छा आहे की, मराठी सिनेनिर्मात्यांनी मराठीतच चित्रपट बनवावेत. हिंदीमध्ये बनविण्याचा प्रयत्नही करू नये, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ठाण्यात कार्यक्रमप्रसंगी बोलताना दिला. कोर्ट, किल्ला, हाय वे, दम लगा के हैय्या अशा चित्रपटांची आज गरज आहे. हे चित्रपट केवळ चांगलेच नव्हे तर यशस्वी पण होत आहेत, अशा भावनाही त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केल्या. इंद्रधनूच्या वतीने श्री समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या रंगोत्सवात शनिवारी नसीरुद्दीन यांची मुलाखत झाली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात खूप स्ट्रगल्स आले. कोणतीही अशी गोष्ट घडली नाही की, ज्यामुळे माझे स्ट्रगल संपले आणि चांगले दिवस सुरू झाले. चांगले दिवस आले, पण तेही हळूहळू. स्ट्रगल अजूनही सुरूच आहे. हे सांगताना त्यांनी विजयाबार्इंची एक आठवण सांगत त्यांच्यासोबत थिएटरमध्ये काम करायला न मिळाल्याची खंत व्यक्त केली. मी खूप वाईट चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. परंतु, याबाबत मला कोणताही पश्चात्ताप होत नसून उलट यातून काही ना काही शिकायला मिळाले. निरीक्षण, कल्पनाशक्ती याबरोबर दुसऱ्याच्या दु:खाची जाणीवदेखील अभिनेत्याला असली पाहिजे. शाह यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की, चित्रपट बनविणे खूप कठीण आहे आणि त्याहून कठीण वाईट चित्रपट बनविणे आहे. वाईट चित्रपट बनविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. विजय केंकरे यांनी घेतलेल्या या मुलाखतीत वैविध्यपूर्ण प्रश्न विचारून नसीरुद्दीन यांना त्यांनी बोलते केले.
किल्ला, कोर्ट, हाय-वे दर्जेदार!
By admin | Published: December 07, 2015 1:01 AM