कल्याण : शहरातील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने निधी मंजूर केला होता. मात्र, आता सरकारकडे निधीच नसल्याने या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे ते अर्धवट अवस्थेत पडून आहे. काही दिवसांनी येऊ घातलेल्या नवरात्रीनिमित्त दुरुस्तीच्या कामाला गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुर्गाडी देवीच्या नावावरून या किल्ल्याला ‘किल्ले दुर्गाडी’ हे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हा किल्ला पावन झाला आहे. त्यामुळे किल्ले दुर्गाडी हा कल्याणचे एक भूषण आहे. या किल्ल्याच्या देखभाल- दुरुस्तीसाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून सव्वाचार कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. त्यानुसार सरकारने त्याची निविदा काढून श्रीदत्त कन्स्ट्रक्शन कंपनीला किल्ल्याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम दिले. पर्यटन विभागाने सव्वाचार कोटींपैकी एक कोटी ७० लाख रुपये पहिल्या टप्प्यात देण्याचे मान्य केले. त्यापैकी प्रथम २५ लाखांची रक्कम संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आली.
कंत्राटदाराने एक बुरूज व पायऱ्यांचे काम पूर्ण केले. हे काम २०१८ अखेरपर्यंत पूर्ण केले असले तरी या कामाची ९० लाखांची रक्कम अजूनही कंत्राटदाराला दिलेली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने काम थांबविले आहे. या प्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले होते. तसेच कंत्राटदारानेही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, जिल्हाधिकाºयांकडून या कामासाठी सरकारकडे निधीच उपलब्ध नाही, असे सांगितलेजात आहे. त्यामुळे निधीअभावी हे काम ठप्प आहे.