मीरारोड - राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील भाईंदर येथील चौक समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्यात मद्यपान - धुम्रपानासह अनैतिक प्रकार सुद्धा होत असल्याचा आरोप गडप्रेमींनी केला आहे . किल्ल्याच्या साफसफाई दरम्यान दारूच्या बाटल्या , सिगारेटची पाकिटे तसेच निरोध सुद्धा सापडल्याने संताप व्यक्त होत आहे . दरम्यान आयोगाने पोलीस आयुक्तालय , जिल्हाधिकारी याना त्यांचे म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले असून महापालिकेने देखील वेळ मागितली आहे.
धारावी किल्ला हा पुरातन असून पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो . या ठिकाणी महापालिकेने किल्ल्याच्या काही भागात चिमाजी अप्पा यांचा पुतळा , उद्यान आदी विकसित केले आहे . गेल्या काही वर्षां पासून शिवप्रेमी व गडप्रेमी यांनी धारावी किल्ल्याच्या स्वच्छतेची नियमितपणे मोहीम चालवली आहे . किल्ल्याच्या संवर्धन व संरक्षणाचौ मागणी सातत्याने गडप्रेमींनी चालवली आहे.
महापालिकेने किल्ला दत्तक घेण्याची तयारी दर्शवली असून निधीची तरतूद केली आहे . खासदार राजन विचारे व आमदार गीता जैन यांच्या पाठपुराव्याने शासनाने देखील किल्ल्याचा पुनर्विकास साठी निधी मंजूर केला . महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी किल्ल्याचे पावित्र्य राखले जावे म्हणून नागरिकांना आवाहन करणारे सूचना फलक सुद्धा या ठिकाणी लावून घेतले आहेत.
किल्ल्यावरील मद्यपान , धूम्रपान आदी प्रकार सातत्याने घडत असल्याची दखल नुकतीच राज्य मानवी हक्क आयोगाने स्वतःहून घेतली आहे . आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील रविवार २७ नोव्हेम्बर रोजी श्रेयश सावंत, राहुल पानपट्टे, विनोद देसाई, शुभम ढोके, निखिल पाटील आदी गडप्रेमींना किल्ल्यात साफसफाई करताना दारूच्या बाटल्या, सिगरेट- गुटखा ची रिकामी पाकिटे व थोटके तर नेहमी प्रमाणे सापडलीच पण निरोधाची पॅकिट तसेच वापरलेले निरोध सुद्धा सापडले. धारावी सारख्या मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यावर मद्यपान , धूम्रपान पासून अनैतिक प्रकार होणे संतापजनक असल्याचे गडप्रेमींनी म्हटले आहे.
पोलीस व महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करण्यास कारणीभूत असून या पुढे गडप्रेमींना असे गैर कृत्य करताना कोणीही आढळून आल्यास त्याला चांगलाच चोप देण्यात येईल व पुढे काही झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस आणि पालिकेची असणार आहे असा इशारा श्रेयस सावंत यांनी दिला आहे .
दरम्यान बुधवार ३० नोव्हेम्बर रोजी राज्य मानवी हक्क आयोगा समोर महापालिकेने माहिती दिली असली तरी सविस्तर माहिती देण्यासाठी पालिकेने वेळ मागितली . आयोगाने या प्रकरणी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय व ठाणे जिल्हाधीकारी यांना सुद्धा त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत . येत्या १३ डिसेम्बर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे .