ठाणे: बेकायदेशीररित्या परकीय चलन बाळगून भारताबाहेर पलायनाच्या तयारीत असलेल्या रफीक खान (५२, रा. मुंब्रा), अमजद खान (४२, रा. अमृतनगर, मुंब्रा), अब्दुल शेख (५४, रा. मुंब्रा) आणि मुमताजजान शेख (४७, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) या चौघांना मुंब्रा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून भारतीय पारपत्र, विमान तिकिटे, २१ लाख ७० हजार ८१९ इतक्या भारतीय मूल्याचे परकीय चलन तसेच पाच लाखांची कार जप्त केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.काही जण बेकायदेशीररित्या परकीय चलन बाळगून देशाबाहेर पसार होणाच्या तयारीत असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ए. टी. बडे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक ए. एम. क्षिरसागर, उपनिरीक्षक बडे आदींच्या पथकाने २४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मुंब्य्रातील दत्तूवाडी पेट्रोल पंप येथे सापळा लावला. त्यावेळी रफिक खान याच्यासह चौघांना या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी रकिक याच्या ताब्यातून पासपोर्ट तसेच २४ मार्च २०१९ रोजीचे विमान तिकीट, अहमद खान याच्या झडतीमध्ये पासपोर्ट आणि २४ मार्च रोजीचे विमान तिकीट तसेच आठ लाख ८५ हजार दहा रुपये भारतीय मूल्य असलेले आखाती देशाचे (यूएई) ४७ हजार दिराम जप्त करण्यात आले. अब्दुल शेख यांच्या अंगझडतीमधून पाच लाखांची टी परमिट असलेली कार आणि मुमताजजान हिच्याकडूनही पासपोर्टसह २४ मार्च रोजीचे विमान तिकीट तसेच पाच लाख ३२ हजार ६०९ भारतीय मूल्याचे सात हजार ७०० रुपयांचे अमेरिकन चलन असा सुमारे २१ लाख ७० हजार ८१९ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या परकीय चलनाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता या चौकडीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडील चलन हे चोरीचे अथवा बेकायदेशीररित्या बाळगल्याचा संशय निर्माण झाल्याने या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन २५ मार्च रोजी पहाटे १ वा. च्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. या चौघांचीही ठाणे न्यायालयाने जामीनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली..
बेकायदेशीररित्या परदेशी चलनासह भारताबाहेर पलायनाच्या तयारीतील चौकडीला मुंब्य्रातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:42 PM
परकीय चलन बाळगून भारताबाहेर पलायनाच्या तयारीत असलेल्या रफीक खान याच्यासह चौघांना मुंब्रा पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून विमानाची तिकीटे आणि मोठया प्रमाणात परकीय चलन हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठळक मुद्देएका महिलेचाही समावेशमुंब्रा पोलिसांची कारवाई२१ लाख ७० हजारांचे परकीय चलन हस्तगत