नितिन पंडीत
भिवंडी - शुक्रवारी गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच सकाळी साडे अकराच्या सुमारास शहरातील संत नामदेव मंदिर शेजारी असलेल्या दर्पण बुक डेपो या दुकानाच्या गल्लीत गटारा मार्गे शिरलेल्या एका साडे चार फूट लांबीची घोरपड अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने पकडून तालुक्यातील वडपा येथील जंगलांमध्ये सुरक्षितरित्या सोडले आहे.
मागील पाच दिवसांपूर्वी ही घोरपड महापालिकेच्या सार्वजनिक गटारात नागरिकांना आढळून आली होती. त्यामुळे स्थानिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दल व ठाण्यातील एका प्राणी मित्राच्या संघटनेला पकडण्यासाठी पाचारण केले होते. मात्र ही घोरपड लांबीने मोठी व चपळ असल्याने ती पकडण्यास अपयश येत होते. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन अर्धवट सोडून सर्वजण निघून गेले होते. त्यामुळे घोरपड तशीच गटारात असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
शुक्रवारी सकाळी ही घोरपड गटारातून बाहेर आली आणि दुकानाच्या गल्लीमध्ये बसून होती हे पाहताच दुकानदारांनी अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनेची माहिती दिली . त्यांनतर पुन्हा जवानांनी घटनास्थळी धाव घेऊ चकमा देऊन पळालेल्या घोरपडीस मोठ्या शिताफीने पकडून कापडाच्या गोणीमध्ये बंद केले. यावेळी या घोरपडी ने आपले शरीर फुगवून जोरात शेपटीचा मारा जवानांवर केला मात्र त्यांनी तो चुकवत यशस्वीरित्या या घोरपडीस पकडून तिला सुरक्षितपणे भिवंडी - नाशिक महामार्गावरील वडपा गाव जंगलात सोडण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान राजू कासारे, बापू गुरव, आसाराम आघाव, देविदास वाघ, हरिश्चंद्र साबरे या जवानांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.