ठाणे: तलवारीच्या धाकावर व्यापाऱ्यांकडून खंडणीची मागणी करणाऱ्या दीपक भालेराव (१९), सनी दळवी (२०), मुकेश गौंड (२२) आणि राजेश राजपूत (२४) या चौघांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.त्यांच्याकडून दोन तलवारी, एक कोयता, चार मोबाईल आणि दोन हजार ३४० रोख असा ऐवजही हस्तगत केला आहे. या चौघांसह सागर वाघ उर्फ म्हाताऱ्या दुर्गेश वारघडे या पाच जणांनी तलवार आणि कोयत्याचा धाक दाखवून कळव्याच्या रेल्वे कॉलनीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील व्यापाऱ्यांना १८ जुलै रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास खंडणीसाठी धमकावले. त्यांच्याकडून काही रोकडही जबरदस्तीने लुटली.
‘याठिकाणी धंदा करायचा नाही. धंदा केल्यास खून केला जाईल,’ अशी त्यांना धमकी दिली. याप्रकरणी कळव्याचे पोलीस हवालदार प्रविण संख्ये यांनी १९ जुलै रोजी या पाचही जणांविरिुद्ध दरोडा, खंडणी, मारहाण या कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यातील चौघांना अटक केली असून सागर वाघचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. बागवान यांनी सांगितले.