मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या ६ पैकी ४ प्रभाग समिती सभापतीपदांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी भाजपचे वैशाली रकवी, मीना कांगणे, दौलत गजरे व हेतल परमार हे सभापतीपदी निवडून आले. त्यांनी शिवसेना - काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा पराभव केला. तर दोन प्रभाग समित्यांवर भाजपचे सचिन म्हात्रे व रक्षा भूपतानी हे आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.पालिकेच्या एकूण ६ प्रभाग समिती सभापतीपदांसाठी निवडणूक जाहीर झाल्यावर भाईंदर पश्चिमेच्या प्रभाग समिती दोनमध्ये भाजपच्या भूपतानी तर काशिमीरा प्रभाग समिती सहामध्ये म्हात्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने या ठिकाणी भाजपचे सभापती बिनविरोध निवडून आले होते. तर चार प्रभाग समिती सभापतीपदांसाठी निवडणूक झाली असता भाजपने वर्चस्व कायम राखले. भाईंदर पश्चिम प्रभाग समिती एकसाठी भाजपकडून रकवी तर शिवसेनेच्या हेलन गोविंद यांच्यात लढत झाली. रकवी यांना ७ तर हेलन यांना ४ मते मिळाली. पूर्व प्रभाग समिती क्र. ३ सेनेच्या अर्चना कदम यांना ९ मते पडली.प्रभाग समिती चारमध्ये भाजपचे गजरे यांना १२ तर काँग्रेसच्या गीता परदेशी यांना ७ मते मिळाली. मीरा रोडच्या प्रभाग समिती पाचसाठी भाजपच्या परमार यांना ७ तर काँग्रेसचे अशरफ शेख यांना ४ मते मिळाली. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडणूक झाली. महापौर ज्योत्स्ना हसनाळे, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रेंनी विजयी सभापतींचे अभिनंदन केले. माजी आमदार नरेंद्र मेहताही उपस्थित होते.
मीरा-भाईंदर मनपा प्रभाग समिती सभापतीपदी भाजपचे चार उमेदवार विजयी, शिवसेना-काँग्रेसचा धुव्वा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 1:17 AM