सुरेश लोखंडे, ठाणे: जिल्ह्यातील तीन लाेकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल हाेत आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी ठाणे व भिवंडी या दाेन्ही लाेकसभा मतदारसंघात प्रत्येकी दाेन उमेदवारांनी उमेदवारी साेमवारी दाखल केली. या दाेन मतदारसंघांसह कल्याण लाेकसभा मिळून तब्बल ७७ उमेदवारी अर्जांचे वितरण करण्यात आले आहे.
ठाणे लाेकसभेसाठी उद्धव सेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी शक्तीपदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. तर ओबीसी जनमार्चाचे मल्लिकार्जुन पुजारे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. या मतदारसंघासाठी आज आठ जणांनी २१ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. याप्रमाणेच भिवंडी लाेकसभेसाठी महायुतीचे भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कॅंग्रेस शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) या दाेन्ही मात्तंबर उमेदवारांनी आज उमेदारी दाखल केली आहे. या मतदारसंघासाठी आठ इच्छुकांनी २८ अर्ज आज घेतले आहेत. तर कल्याण मतदारसंघासाठी आज एकाही उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. मात्र १९ इच्छुकांनी २८ अर्ज घेतल्याचे उघड झाले आहे.