मीरा रोड : माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेतील १७ अधिकाऱ्यांपैकी चार अधिकारी लाचखोर, तर अन्य अधिकारीसुद्धा वादग्रस्त, कामचुकार असल्याचा पलटवार माहिती अधिकारात कार्यकर्त्यांनी केला आहे. ज्यांनी पैसे मागितले असतील, त्यांची नावे देऊन गुन्हा दाखल करण्याची हिम्मत अधिकाऱ्यांनी दाखवावी, असे आव्हानसुद्धा दिले आहे.
तक्रार अर्जात ब्लॅकमेल करणाऱ्यांची नावे देऊन अधिकाऱ्यांनी अर्ज केला पाहिजे होता. सर्वांनाच त्यात ओढणे म्हणजे माहिती अधिकार कायद्याची मुस्कटदाबी करण्याचा डाव असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. जर तुम्ही खोटी कामे केली नाहीत तर घाबरता कशाला, आतापर्यंत दिलेली माहिती तसेच दैनंदिन कामकाज संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास पालिका टाळाटाळ का करत आहे, असे सवाल माहिती अधिकार कार्यकर्ता कृष्णा गुप्ता यांनी केले आहेत. तक्रारदार अधिकाऱ्यांची मालमत्ता आणि गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी केली आहे.