ऑनलाईन लोकमत
ठाणे, दि. ५ - ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले ठाणे महापालिकेतील चारही नगरसेवकांनी शनिवारी सकाळी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. सुधाकर चव्हाण, हनंमत जगदाळे, विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला या चारही नगरसेवकांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिन देण्यास नकार दिला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार हे चारही नगरसेवक शनिवारी पोलिसांना शरण आले.
आपली अटक टाळण्यासाठी मागचे दोन महिने हे नगरसेवक धडपडत होते. शरण आलेल्या या चारही नगरसेवकांना अटक करुन ठाणे न्यायालयात हजर केले जाईल व चौकशीकरता त्यांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली जाईल. या चारही नगरसेवकांचे आर्थिक व्यवहार आणि त्यांच्या बॅकखात्याची तपासणी करण्यात येणार आहे.
परमार यांनी ७ ऑक्टोंबर रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी या चारही नगरसेवकांविरोधात कासारवडवली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता.