अंबरनाथ: अंबरनाथ येथील डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल यंदा १६ मार्च ते १९ मार्चदरम्यान प्राचीन मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील कलाकार या ठिकाणी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. प्राचीन शिवमंदिराचा राष्ट्रीय स्तरावरील पर्यटन स्थळ म्हणून विकास होणार असून त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. मंदिर परिसर विकासाच्या ध्येयासह गेल्या आठ वर्षांपासून मंदिर परिसरात शहरातील कला प्रेमी आणि रसिकांसाठी आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या उपस्थितीत शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र गेली दोन वर्षे करोना प्रादुर्भावामुळे हा उत्सव आयोजित करण्यावर निर्बंध आले होते. अखेर दोन वर्षांच्या अंतरानंतर यंदा चार दिवसांच्या शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पहिल्यांदाच शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये संगीत पहाटही अनुभवता येणार आहे. शनिवार १८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांच्या गीतांची मैफल रसिकांना अनुभवता येईल.
रविवार १९ मार्च रोजी मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या रंगमंचावर सकाळी सात वाजता गायिका मैथली ठाकुर रसिकांपुढे तिची लोकप्रिय गाणी सादर करणार आहे. महोत्सवात भव्य कला दालनांमध्ये जुन्या-नव्या चित्रकारांच्या कलाकृतींचे तसेच छायाचित्रांचे प्रदर्शन रसिकांना पाहता येईल. अनेक प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचा समावेश असणारा खाद्य महोत्सव ही खवैय्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवात रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. या सप्तरंगी संगीत महोत्सवात १६ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता मुख्य रंगमंचावर पहिल्या सत्रात प्रख्यात बासरी वादक राकेश चौरसिया आणि सहकाऱ्यांचे फ्युझन आणि दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ गायक पंकज उधास त्यांच्या सदाबहार गझल सादर करणार आहेत. तर १७ मार्च रोजी नव्या पिढीचा लोकप्रिय गायक अमित त्रिवेदी आणि सहकाऱ्यांचे सादरीकरण होईल. तसेच १८ मार्च रोजी तरूणाईच्या गळ्यातला ताईत असलेला लोकप्रिय गायक मोहित चौहान आणि महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी १९ मार्च रोजी विख्यात गायक शंकर महादेवन यांच्या सादरीकरणाने महोत्सवाची अखेर होणार आहे.