लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आधीच शाळेची पटसंख्या वाढत नाही, दर्जेदार शिक्षणाची हमी नाही, असे असतांनाही या सर्वांवर मात करून पालिका शाळेतील १० वी मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी गुणांचा टक्का वाढविला आहे. त्यांचा सत्कार मंगळवारी महासभेनिमित्त करण्याचे ठरवण्यात आले. पण सत्कारासाठी त्यांनातब्बल चार तास या ताटकळत राहावे लागल्याची गंभीर बाब महासभेत उघड झाली. त्यातही आपल्या पाल्याचा सत्कार पाहावयास मिळावा म्हणून अनेक पालक सभागृहात प्रवेशासाठी जाऊ इच्छित असतांना, प्रवेश नाकारल्याने त्यांचा हिरमोड झाला.दहावीत अनेक विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले. एक विद्यार्थी तर पायाने अधू असतांनाही त्याने ९४ टक्यापर्यंत मजली मारली. अशा विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवारी महासभेत होणार होता. सकाळी १० वाजताच ही मुले पालक आणि शिक्षकांसह मुख्यालयात दाखल झाली. त्यांना सुरवातीला कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महासभा सुरु होईपर्यंत ताटकळत ठेवले. महासभा ४ तास उशिराने सुरु झाली. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. देवराम भोईर यांनी ही खेदजनक बाब असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना अशी वागणूक दिली जाते, हे चुकीचे असून त्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्रक देण्याऐवजी ठराविक रक्कम देण्याची मागणी नगरसेविका अपर्णा साळवी यांनी केली. परंतु विद्यार्थ्यांना १२ वाजता बोलविल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे आणि शिक्षणाधिकारी उर्मिला पारधी यांनी दिली. मग या विद्यार्थ्यांना १० वाजता कोणी बोलावले, असा सवाल उपस्थित झाला. या विद्यार्थ्यांना शिक्षकांनीच बोलावल्याची माहिती उघड झाली. त्यावर यापुढे असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही यावेळी महापौरांनी दिली.
सत्कारासाठी अन्न पाण्याविना उत्तीर्ण विद्यार्थी ताटकळले चार तास
By admin | Published: June 21, 2017 4:39 AM