लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तीन हात नाका येथील बस थांब्यावर उभ्या असलेल्या चौघांना एका कारने जोरदार धडक दिल्याने सुनंदा मधुकर तोरणे (५०) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तर इतर तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. अपघातग्रस्त कारचा मद्यपी चालक राकेश तावडे (३५) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.मद्यधुंद अवस्थेत असलेला तावडे त्याच्या कारने ठाण्याच्या मल्हार सिनेमा येथून घाटकोपरकडे जाण्यासाठी तीन हात नाका येथून रात्री ८.१० वाजण्याच्या सुमारास जोरदार वळण घेत होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने तीन हात नाका येथे बसची वाट पहात उभ्या असलेल्या सुनंदा तोरणे, विश्वनाथ वेणू गोपाल (६७, रा. मुलूंड) आणि नितेश कांबळे यांच्यासह चौघांना त्याच्या कारची जोरदार धडक बसली. यात सुनंदा या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने मुंबई, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर तिघेजण या अपघातामध्ये किरकोळ जखमी झाले. विश्वनाथ यांना ठाण्याच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित दोघांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मद्य प्राशन करुन बेदरकारपणे कार चालवून रोडवरील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी तावडे याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सांगितले.
ठाण्यातील बस थांब्यावर चौघांना कारची धडक: मद्यपी चालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 9:04 PM
बसची वाट पहात तीन हात नाका येथील बस थांब्यावर उभे असलेल्या एका महिलेसह चौघांना एका मद्यधुंद कार चालकाने धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुनंदा तोरणे (५०) या महिलेला मुंबईच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठळक मुद्देतीन हात नाका येथील घटनानौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलमहिला गंभीर जखमी