उल्हासनगर/म्हारळ : उल्हासनगर पालिकेच्या डोंगराएवढ्या कचऱ्याचे ढीग कोसळून म्हारळ येथे झालेल्या दुर्घटनेत चार मुले जखमी झाली. ढिगाऱ्याखाली दोन मुले दबल्याची चर्चा असल्याने स्थानिकांचा जमाव काही काळ आक्रमक झाला होता. ढिगारे हटवण्यात आले असून सध्या त्या बागात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कचऱ्याच्या सपाटीकरणावर उल्हासनगर पालिका दरवर्षी चार कोटी रूपये खर्च करते. तरीही आठवडाभरात कचऱ्याचा ढीग कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे उल्हासनगरचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कचरा टाकण्यासाठी त्वरित पर्यायी जागा उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. डम्पिंगच्या जागेभोवती पाच वर्षांपूर्वी मोकळी जागा होती. अतिक्रमण होऊन तेथे वस्ती वाढली आहे. त्यामुळे त्यावरही कारवाई करण्याबाबत अधिकाऱ्यांची यावेळी चर्चा झाली. कचऱ्याचा ढिगारा कोसळला तेव्हा मुले घरात खेळत होती. ती घरे कचऱ्याखाली गाडली गेली. दीपक चंदनशिवे (पाच), पूनम चंदनशिवे (तीन), मनीषा चंदनशिवे (एक) आणि निकिता लोखंड (सहा) अश्ी त्यांची नावे आहेत. >या जागी कचरा टाकू नये, यासाठी प्रदूषण मंडळाने पालिकेला गेली तीन वर्षे नोटिसा पाठविल्या आहेत. त्यातही नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
डम्पिंगचा भाग कोसळून म्हारळ येथे चार जखमी
By admin | Published: October 03, 2016 3:40 AM