ठाणे : सुपारीसह जनरल किराणा मालाच्या घाऊक विक्रेत्याकडे भरदिवसा एक लाख दहा हजारांची चोरी करणा-या इरफान कुरेशी, रमजान खान, तारीक अशरफ उर्फ शानू आणि अरशद खान या चौघांना शनिवारी वारी डायघर पोलिसांनी मोठ्या कौशल्याने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील एक लाखांच्या रोकडसह मोबाईलही हस्तगत केला. तर रविवारी त्यांना ४ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.डायघरच्या शिबलीनगर येथील एका दुकानाचे व्यापारी अब्दुस शेख हे २९ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० ते २.३० या कालावधीत शीळफाटा येथील मस्जिदमध्ये नमाजासाठी गेले होते. त्या अवघ्या एकच तासांत एका रिक्षातून आलेल्या १८ ते १९ वयोगटातील या चौघांनी त्यांच्या दुकानातून ही रोकड लंपास केली. त्यांच्यापैकी रमजान आणि अशरद टेहळणी करण्यासाठी थांबले. तारीक रिक्षात बसून राहिला. तर इरफानने शटरची कडी उघडून दुकानात शिरकाव केला. त्यानेच गल्ल्यातील एक लाख दहा हजारांची रोकड आणि एक हजारांचा मोबाईल घेतल्यानंतर या चौघांनी त्याच रिक्षातून पलायन केले. याप्रकरणी ३० सप्टेंबर रोजी शेख यांनी डायघर पोलीस ठाण्यात ही चोरीची तक्रार दाखल केली. पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी, कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनी दिवसाढवळया झालेल्या या चोरीची गंभीर दखल घेतली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जावेद शहा यांच्या पथकाने परिसरातील अनेक भागात चौकशी करुन अनेक दुकानांचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. शेख यांच्या दुकानापासून जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये निळ्या हूडची रिक्षा चोरीच्या वेळी जातांनाचे चित्रण तपास पथकाच्या हाती लागले. त्याचआधारे केलेल्या तपासातून इरफान याने त्याच्या तीन साथीदारांसह ही चोरी केल्याची माहिती एका खबºयाने पोलिसांना दिली. हे चौघेही मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरुन एका रिक्षात बसणार असल्याची टिप पोलिसांना मिळाली. त्यानुसार एपीआय जावेद शहा, हवालदार धनंजय मोहिते, पोलीस नाईक हेमंत भामरे, अजिज तडवी, ललित वाकडे, जयवंत कोळी, महेंद्र बरफ आणि पंकज गायकर आदींच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावून या चौघांनाही अटक केली. रविवारी ठाणे न्यायालयाने या चौघांनाही ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या टोळीकडून आणखीही अशाच प्रकारच्या चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या टोळीने नातेवाईकांकडे दिलेली एक लाखांची रोकड आणि एक मोबाईलही सोमवारी (२ आॅक्टोबर रोजी) पोलिसांनी हस्तगत केला आहे.