मीरा राेड : मीरा-भाईंदर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने नालेसफाई करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याने त्याला चार लाख ६४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठ्या कच्च्या व पक्क्या नालेसफाईसाठी ठेका देते. दरवर्षी नालेसफाईच्या कामावरून ठेकेदार आणि पालिकेविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असतात. यंदाचा नालेसफाईचा ठेका हा मेसर्स एम.बी. ब्रदर्स या ठेकेदारास देण्यात आला होता. नालेसफाईचे काम करणाऱ्या ठेकेदाराने कंत्राटी मजुरांना नालेसफाई करताना सुरक्षिततेसाठी आवश्यक गमबूट, हातमोजे, मास्क आदी साहित्य देणे बंधनकारक आहे.
परंतु, सदर ठेकेदाराने मजुरांना आवश्यक सुरक्षा साहित्य पुरवले नसल्याने मजूर आरोग्य व जीविताची जोखीम पत्करून काम करीत असल्याचे दिसून आले होते. त्याची छायाचित्रांसह तक्रार सत्यकाम फाउंडेशनच्या कृष्णा गुप्ता या तरुणाने केली होती. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी याच तक्रारींच्या अनुषंगाने ठेकेदारास चार लाख ६४ हजार ५१५ रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम त्याच्या देयकातून कापून घेतली असल्याचे पानपट्टे यांनी लेखी उत्तरात कळवले आहे.
गेल्या वर्षीही ठाेठावला हाेता दंडगेल्या वर्षी नालेसफाई करणाऱ्या मजुरांना सुरक्षा साहित्य न पुरवल्याबद्दल गुप्ता यांच्या तक्रारीवरून त्यावेळच्या आशापुरा कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास एक लाख ९९ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता.