- धीरज परबमीरा रोड : फेब्रुवारीमध्ये निधन झालेल्या मीरा-भार्इंदर महापालिकेतील एका कर्मचाºयाचा मार्च ते जून असा चार महिन्यांचा पगार काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारावरून मीरा-भार्इंदर पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेत सुंदरम शेईगा हे सफाई कामगार म्हणून कायम सेवेत काम करत होते. भार्इंदरच्या भोलानगरमध्ये राहणाºया सुंदरम यांनी फेब्रुवारी महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. १३ फेब्रुवारी रोजी निधन झाल्यानंतर साहजिकच पालिकेच्या आस्थापना विभागाने त्या मृत कर्मचाºयाचा पगार काढणे बंद केले पाहिजे होते. परंतु, पालिकेच्या आस्थापना विभागासह अन्य संबंधित विभागानेही सुंदरम यांचा मार्च, एप्र्रिल, मे व जून अशा चार महिन्यांचा पगार दरमहा काढून त्यांच्या खात्यात जमा केला.
सफाई कामगार म्हणून सुंदरम यांचे मूळ वेतन ३७ हजार ७९४ रु पये इतके असले तरी कपात करून त्यांचे वेतन २८ हजार ९४ रु पये इतके होत असे. या अनुषंगाने चार महिन्यांत पालिकेने कर्मचाºयाचे निधन झाल्यानंतरही सुंदरम यांना काम केल्याच्या मोबदल्यात एक लाख १० हजार रु पये दिले असण्याची शक्यता आहे.
मुळात सुंदरम यांचा मृत्यू झाल्याची माहिती संबंधित विभागासह आस्थापना विभागास मिळाली नाही, यावर कुणाचाही विश्वास बसणे अवघड आहे. गंभीर बाब म्हणजे हजेरीपत्रकावर मृत कर्मचाºयाची स्वाक्षरी नव्हती, तर पगार काढला कसा? आणि स्वाक्षरी होती तर बनावट स्वाक्षरी करून पगार घेतला का? असे प्रश्न आता पालिका प्रशासनाला पडू लागले आहेत.