कल्याण/बिर्लागेट : म्हारळ गावातील मेहंदी शेखच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या चौघांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तय युवकाच्या खुनाबद्दल इतर आरोपींबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.सुरज यशवंत चौधरी, युवराज पतंगे, रवी दंबगे आणि माया चौधरी अशी त्यांची नावे आहेत.दोन दिवसांपूर्वी टेम्पो भाड्याने न दिल्याच्या रागातून बुधवारी रात्री जमावाने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या मुस्लिम तरूणावर पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे म्हारळ गावात असलेला तणाव अजून कायम आहे.शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजता मेंहदी शेखचा मृतदेह जे. जे. हॉस्पिटल मधून सुर्यानगर येथे आणण्यात आला. तो आणल्याचे कळताच त्याच्या अंत्यसंस्कारासाठी परिसरातील मुस्लिम समाजाचे तरूण मोठ्या संख्येने जमा झाले होते. नंतर कडेकोट बंदोबस्तात मेंहदी शेखचा मृतदेह कल्याणला नेण्यात आला आणि तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेवेळी एका लहान मुलाला फेकून दिल्याचा प्रकारही नंतर उघडकीस आला होता. टिटवाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर चार आरोपींना गुरूवारी रात्री अटक करण्यात आली. पण अन्य आरोपींवर कारवाई झालेली नाही.
म्हारळ हत्येप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी,तणाव कायम : बंदोबस्तात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 3:14 AM