ठाणे: चालत्या लोकलमधून चार प्रवासी जखमी झाल्याची घटना मुंब्रा-कळवा दरम्यान घडली. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन प्रवाशांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं. काल झालेल्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. लोकल गाड्यांची संख्या कमी असल्यानं प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागत आहे. लोकलमध्ये मोठी गर्दी असल्यानं प्रवाशांवर लटकून प्रवास करण्याची वेळ आली. जीव मुठीत धरुन प्रवास करणारे मुंब्रा-कळवा दरम्यान चार जण चालत्या गाडीतून खाली पडले. नाजमीन शेख, नाजीर शेख, निखिलेश कुबल अशी लोकलमधून पडलेल्यांची नावं आहेत. तर चौथ्या प्रवाशाचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. नाजमीन शेख यांच्या हाताला, पायाला आणि मानेला मुका मार लागला आहे. तर नाझीर शेख यांच्या पायाला दुखापत झाली आहे. निखिलेश कुबलच्या डोक्याला मार लागला आहे. नाझीर शेख, निखिलेश कुबल आणि एका जखमी तरुणाला उपचारानंतर सोडून देण्यात आलं. तर नाजमीन शेख यांच्यावर कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे काल दिवसभर बंद असलेली मध्य रेल्वेची सेवा आज सुरू झाली. मात्र लोकलची संख्या कमी असल्यानं प्रवाशांची प्रचंड गर्दी रेल्वे स्थानकांवर पाहायला मिळाली. आज पाऊस नसतानाही रेल्वे विभागाने रविवारच्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या सुरु केल्याने सकाळपासूनच बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे या रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळाली. त्यात रविवारच्या वेळपत्रकामुळे प्रवासी संख्या जास्त आणि रेल्वे गाड्यांची संख्या कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
मुंब्रा-कळवा दरम्यान चालत्या ट्रेनमधून पडल्यानं चार प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 2:34 PM