मीरारोड - डंपर बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून शिवसेनेच्या शाखेत तोडफोड झाली आहे. याशिवाय एका शिवसैनिकादेखील मारहाण करण्यात आली. यामुळे काही काळ भाईंदरच्या उत्तर परिसरात तणाव निर्माण झाला. तोडफोड करणाऱ्या चार जणांनी शाखेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती खाली ढकलून दिली. याशिवाय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेवरील हार तोडला. यानंतर पोलीस आणि शिवसेना नेते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
भार्इंदरच्या उत्तन नाका येथे शिवसेनेची जुनी शाखा आहे. या शाखेलगत समुद्र किनारी अनधिकृत बांधकाम सुरु आहे. दिवसा ढवळ्या सर्रास चालणाऱ्या या अनधिकृत बांधकामाकडे महापालिका प्रशासनाची सातत्याने डोळेझाक सुरु आहे. आधीच अरुंद रस्ता त्यात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी येणारे डंपर यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने लोक त्रासले आहेत. आज सकाळीदेखील बांधकाम ठिकाणी साहित्य घेऊन आलेला डंपर रस्त्यातच उभा असल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यावेळी शाखेजवळ असणारे शिवसैनिक विश्वनाथ राठोड यांनी डंपर चालकास वाहनांची रांग लागली आहे, डंपर हटव असे सांगितले. यानंतर चालकाने अरेरावी करत बांधकाम ठिकाणी उभे असलेले लियाकत कुरेशी (४०) यांना बोलावले. यानंतर चार जणांनी राठोड यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.
स्वत:ला वाचवण्यासाठी राठोड शिवसेनेच्या शाखेत गेले. कुरेशी व त्याचे साथीदारदेखील शाखेत घुसले व त्यांनी आत तोडफोड करत राठोड यांना मारहाण केली. शाखेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मुर्ती खाली ढकलली, तर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेवरील हार ओढून काढला. हा प्रकार शिवसैनिकांसह स्थानिकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकाने बंद करायला सुरुवात झाली. दरम्यान उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रविण साळुंकेसह मोठा पोलीस फाटा घटनास्थळी दाखल झाला. माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी शाखेत येऊन माहिती घेतली. पोलीस व सेना नेत्यांनी जमावाला शांत केल्याने तणाव निवळला.
पोलिसांनी तातडीने पंचनामा करत राठोड यांच्या फिर्यादी वरुन लियाकत शराफत कुरेशीसह नजाकत शराफत कुरेशी (३३), इब्राहिम इकराम खान (३९) व फय्याज आमीर शेख (३४ ) या चौघांना धार्मिक भावना दुखावणे, दंगल, बळजबरी शाखेत प्रवेश केल्याप्रकरणी अटक केली आहे. अन्य पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान शिवीगाळ, मारहाण केल्याच्या कुरेशी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राठोड व अलोक पांडे विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.