उमेश जाधव
टिटवाळा - कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडा टिटवाळा जवळील असणाऱ्या वासुंद्री गावालगतच्या काळू नदीपात्रात बुधवारी रात्री 12 सुमारास देवी विसर्जनासाठी गेलेल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. तरुणांचे मृतदेह शोधण्याचे काम अग्निशमन दल व स्थानिक पोहणारे यांच्या मदतीने सुरू आहे. या घटनेमुळे मांडा टिटवाळा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, मांडा टिटवाळा येथील ओमकारेश्वर सदन तरूण मित्र मंडळाच्यावतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. बुधवारी रात्री देवीच्या विसर्जन मिरवणूक काढून देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी येथील वासुंद्री गावाजवळील काळू नदीवर नेण्यात आले. रात्री बाराच्या सुमारास मंडळाचे आठ तरुण देवीची मूर्ती घेऊन काळू नदीच्या पात्रात उतरले. यावेळी देवीची मूर्ती कलवंडली यामुळे हे तरुण खोल पाण्यात पडले. यापैकी पोहणारे सहा तरूण बाहेर आले. याच वेळी दोन तरुण बुडत असताना त्यांना वाचविण्यासाठी इतर दोन पोहणाऱ्या तरूणांनी पाण्यात उड्या मारल्या. परंतु पाण्याचा प्रवाह व खोली जास्त असल्याने यात विश्वास तुकाराम पवार (35), रुपेश तुकाराम पवार (22), सिद्धेश आनंत पार्टे (22) व सुमित मारूती वायदंडे (26) या चार तरुणांना काळू नदीच्या वाहत्या पाण्याचा अंदाज आला नाही. बघता बघता ते पाण्याच्या प्रवाहात खोलवर वाहत गेले आणि बुडाले. रात्री अंधार असल्यामुळे ते दिसेनासे झाले.
बुधवारीच रात्रीच टिटवाळा पोलीस व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटे चार वाजेपर्यंत सदर तरूणांचा शोध घेतला परंतू ते सापडले नाहीत. गुरूवारी सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा टिटवाळा पोलीस व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवान व स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. या घटनेमुळे मांडा-टिटवाळा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत एकाच घरातले दोघे भाऊ बुडाल्याने पवार कुटुंबावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.
बुधवारी रात्री अंधार व पाण्याचा प्रवाह यामुळे तसेच गुरूवारी दुपारी भरतीची वेळ असल्यामुळे पाणी वाढत आहे. या कारणास्तव शोध कार्यात अडचणी येत आहे. अग्निशमन दल व स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने शोध कार्य सुरू आहे.
- कमलाकर मुंडे, पीएसआय, टिटवाळा.