कल्याण : कारचोरीच्या उद्देशाने उबेरचालकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच २०१२ मध्ये अशाच पद्धतीने एका वाहनचालकाची गळा आवळून हत्या करणा-या चार आरोपींना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. कचरे यांनी नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्येप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले गेले होते. साक्षी पुराव्याअंती गुन्हा सिद्ध झाल्याने ही शिक्षा ठोठावण्यात आली.
आकाश गजानन साळुंखे, सचिन ऊर्फ बटाटा सुभाष निचिते, सचिन ऊर्फ सच्च्या सुभाष निचिते आणि दिनेश काळुराम फर्डे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. चौघेही शहापूरचे रहिवासी आहेत. या चौघांनी गाडी चोरण्याच्या उद्देशाने कल्याण येथील एका टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्समधून एक गाडी बुक केली होती. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्याचा बेत आखला. त्यानुसार संबंधित गाडीतून प्रवासाला सुरुवात केली. प्रवासात वाटेतच ओतुरला चौघांनी रस्सी विकत घेतली. पुढे शिर्डीला जाऊन त्यांनी दर्शनही घेतले. परंतु, परतीच्या प्रवासात त्यांनी नाशिकला पोहोचताच आडबाजूला चालक घनश्याम पाठक यांना गाडी थांबविण्याची सूचना केली. पाठक यांनी गाडी बाजूला घेताच चारही जणांनी रस्सीने त्यांची गळा आवळून हत्या केली. त्यांचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी कसारा घाटात फेकला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. चारही आरोपींना अटक झाली होती. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बी.आर. कुंभारे यांनी केला होता. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यावर साक्षी, पुरावे तपासण्यात आले. सरकारी वकील म्हणून ॲड. रचना भोईर यांनी काम पाहिले.
------------------------------------------------------