ठाणे : दरोड्यासाठी एका बारमालकासह दोघांचा खून करणाऱ्या जांबूआ टोळीतील अमरू मांगो बबेरिया (२२), राजू मेढा (१९), उदयसिंग ऊर्फ छोटू बबेरिया (२१) आणि बापूसिंग सिंगाढे (२०, सर्व रा. जांबूआ जिल्हा, मध्य प्रदेश) यांना खून आणि दरोड्यात जन्मठेप तसेच प्रत्येकी एक लाखांच्या दंडाची त्याचबरोबर मोक्कांतर्गत जन्मठेपेसह प्रत्येकी पाच लाखांच्या दंडाची शिक्षा ठाण्याचे जिल्हा व सत्र तथा मोक्का न्यायाधीश अमित शेटये यांनी बुधवारी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावल्याची माहिती विशेष सरकारी वकील संगीता फड यांनी दिली.
पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या अवधनगर भागातील आपले देशी बारचे दुकान बंद करून बारमालक राकेश मोरे (३१) हे १७ फेब्रुवारी २०१० रोजी मोटारसायकलीवरून घरी निघाले होते. त्याचवेळी दरोडेखोरांची सशस्त्र टोळी आली होती. त्यांनी राकेशकडील पैशांची बॅग खेचण्याच्या प्रयत्न केला. त्याला त्याने जोरदार प्रतिकार केला. तेव्हा उदयसिंग याने राकेशच्या छातीवर गोळीबार केला. ही गोळी त्याच्या छातीतून आरपार जाऊन पाठीतून बाहेर गेली. यात त्याच्याकडील पैशांची बॅग राुद्राक्षाची सोन्याची माळ, पैशांचे पाकीट, मोबाइल आणि सोन्याच्या अंगठ्या असा एक लाख ६८ हजारांचा ऐवज दरोडा टाकून पळ काढला.
पळताना काही अंतरावरच आणखी एकाकडे त्यांनी पैसे आणि मोबाइलच्या जबरी चोरीसाठी गोळीबार केला होता. या दोघांच्या खुनानंतर अमरू, राजू आणि बापूसिंग यांना २० ऑगस्ट २०१० रोजी तर उदयसिंग याला १२ मे २०११ रोजी बोईसर आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. यातील बसू याला दहा वर्षांनंतर अटक झाल्यामुळे त्याचा खटला अद्याप प्रलंबित आहे. तर सहावा मोहनसिंग वसुनिया हा अजूनही पसार आहे.पोलिस ठाण्यातून पसार
अटकेनंतर पाचही आरोपींनी पालघर पोलिस ठाण्याची कौले तोडून पलायन केले होते. याप्रकरणीही त्यांच्याविरुद्ध पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे खून करण्यापूर्वी ते मनोरच्या एका गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटले होते. अटकेनंतर त्यांच्याकडून दागिने, मोबाइल, रोकड तसेच तीन गावठी कट्टे आणि १२ काडतुसे हस्तगत केली होती. पळाल्यानंतर चौघांना बोईसरमधील घरातून अटक झाली होती. बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी एन. के. मुरादे यांनी या प्रकरणाचा तपास केला.खून, दरोडयासह २५ गंभीर गुन्हे-
अमरु आणि त्याच्या टोळीवर खून, दरोडयासह २० ते २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका गुन्हयात अमरु आणि उदयसिंग यांना चार वर्षांची शिक्षा झाली होती. यात ते जामीनावर सुटले होते. याच काळात त्यांनी हे दोन खूनासह दरोडयाचा प्रकार केला होता. या खटल्यात २२ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील संगीता फड यांनी आरोपींच्या शिक्षेसाठी जोरदार बाजू मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार शिर्के यांनी काम पाहिले.