ठाणे : कॅन्सरवर मात करत ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या अनिषा जॉय बारावीच्या परीक्षेत 86 टक्के मिळवून उत्तीर्ण झाली. 11 वी नंतर कॅन्सर झाल्यावर अनिषाला चार शास्त्रक्रियांना सामोरे जावे लागले होते. आणखीन एक शस्त्रक्रिया बाकी असून लॉकडाऊनमुळे ही शस्त्रक्रिया लांबली गेल्याचे तिने सांगितले. दहावी नंतर अनिषाने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. दुर्दैवाने तिला 11 वि नंतर कॅन्सर या गंभीर आजाराने ग्रासले. शस्त्रक्रियामुळे तिला 2017-12018 या दोन वर्षांत ब्रेक घ्यावा लागला. तिने या दोन्ही वर्षात बारावीला प्रवेश घेऊन तो रद्द केला.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिने 2019 मध्ये पुन्हा एकदा प्रवेश घेतला आणि आता ही परीक्षा द्यायची असे मनाशी पक्के केले. परिक्षेआधी आणखीन एक शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने ही परीक्षा देता येईल की नाही असे वाटत होते पण शस्त्रक्रिया पुढे ढककली आणि देवाच्या कृपेने मी परीक्षा देऊ शकली. माझ्यासाठी हा सगळ्यात कठीण काळ होता. ज्ञानसाधना महाविद्यालयाने मला खूप सहकार्य केले असे ती म्हणाली. अनिषा वोकरच्या साहाय्याने चालत आहे पण शिकण्याची प्रबळ इच्छा तिच्या मनाशी आहे. अनिषा अशा परिस्थितीत ही हरली नाही. तिच्या इच्छाशक्तीमुळे तीने यश मिळवले. तिला कॉलेज मध्ये मानसिक त्रास होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतल्याचे ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अनिषाला डॉक्टर बनायचे आहे आणि त्यादृष्टीने ती नीटची तयारी करीत आहे.