पोस्ट कोविड रुग्ण आणि व्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांचेही होणार कौन्सिलिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना लाटेच्या दुसऱ्या टप्प्यात घरीच राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या (होम क्वाॅरंटाइन व होम आयसोलेशन) लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने २१ एप्रिलपासून सुरू केलेल्या कॉल सेंटरमुळे ठाणेकरांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळून शेकडो रुग्णांना गंभीर (क्रिटिकल) अवस्थेत जाण्यापासून रोखण्यात यश मिळाले आहे.
या माध्यमातून घरी असलेल्या कोरोनाबाधितांच्या प्रकृतीची दररोज विचारपूस करण्याबरोबरच दूरध्वनीवरून वैद्यकीय सल्ला तसेच औषधोपचारांबाबत मार्गदर्शन करून आवश्यक औषधेही उपलब्ध करून दिली जात आहेत. यामध्ये दिवसाला सरासरी चार हजार कॉल्स केले जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
मार्चच्या अखेरीस कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यापेक्षा घरीच राहून उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल अधिक होता. त्यामुळे रुग्णालयात दाखल कोरोनाबाधितांपेक्षा होम आयसोलेशन व होम क्वाॅरंटाइन रुग्णांची संख्या अधिक होती. या रुग्णांचे व्यवस्थित ट्रॅकिंग व्हावे, त्यांना वेळच्या वेळी योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा आणि त्यांना गंभीर अवस्थेत जाण्यापासून रोखण्याबरोबरच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, या हेतूने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिकेने कॉल सेंटर सुरू केले.
रुग्णांशी अशाप्रकारे संवाद साधताना एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासल्यास कोविड वॉररूमच्या माध्यमातून कोविड केअर सेंटरमध्ये संबंधित रुग्णास दाखल केले जात आहे. अशा प्रकारच्या तत्काळ प्रतिसाद व्यवस्थेमुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणावर ताण होता. सर्वसाधारण बेड, ऑक्सिजन बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर आदी सुविधा तसेच रेमडेसिविरसारखे औषध मिळण्यास अनंत अडचणी होत्या. अशा परिस्थितीत होम आयसोलेशनमध्ये असलेल्या सुमारे पाच ते सहा हजार रुग्णांचे योग्य ट्रॅकिंग होऊन त्यांना मार्गदर्शन केल्याने त्यांना दिलासा मिळत असून, आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी झाल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले.
* कोविडेत्तर लक्षणांमुळे बरे झालेल्या रुग्णांची करणार विचारपूस
महापालिकेची कोविड वॉररूम, महापालिकेच्या सेवेतील डॉक्टर्स आणि शहरातील काही नामवंत डॉक्टर्स यांच्या समन्वयाने या कॉल सेंटरचे काम प्रभावीपणे सुरू आहे. एप्रिल महिन्यातील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता आता त्यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र, कोविडेत्तर त्रासाची लक्षणेही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. तसेच आता म्युकरमायकोसिस या दुर्मीळ बुरशीजन्य आजाराचाही धोका वाढल्याने बरे झालेल्या रुग्णांचीही पुढील काही दिवस कॉल सेंटरच्या माध्यमातून विचारपूस केली जाणार आहे.
* लसीकरणानंतरही मार्गदर्शन
सध्या लसीकरणाची मोहीम सुरू असून, लस घेतलेल्या नागरिकांनाही सुरुवातीचे दोन दिवस विविध प्रकारचे त्रास जाणवू शकतात. त्यांनाही या काळात वैद्यकीय सल्ल्याची गरज भासू शकते. हे लक्षात घेऊन लसीकरण केलेल्या नागरिकांचेही कॉल सेंटरच्या माध्यमातून काऊन्सिलिंग केले जाणार आहे.