भिवंडी : दहावी पेपरफुटीप्रकरणी भिवंडी पोलिसांनी रविवारी रात्री ९.३० वाजता एका कोचिंग क्लासच्या शिक्षकास अटक केली. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे. मात्र, अद्याप मूळ आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.नाविद मोहम्मद मुलीन अन्सारी (२७) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो शहरातील धामणकरनाका, पटेल कम्पाउंड येथील करिअर एज्युकेशन क्लासमध्ये शिकवणी घेतो. याआधी याच क्लासमधील दोन व काकतिया इंग्लिश हायस्कूलमधील एक अशा तीन शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. काकतिया इंग्लिश हायस्कूलच्या शिक्षकास अटक केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाने कोणतीही भूमिका पोलिसांकडे स्पष्ट केली नाही. अटक केलेला शिक्षक शाळेत कोणत्या पदावर आहे, याची पोलिसांनी खात्री केलेली नाही.दरम्यान, रविवारी रात्री अटक केलेल्या नाविद अन्सारी यास सोमवारी न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार कोचिंग क्लासने आपल्याकडे शिकवणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल चांगला लागावा, यासाठी पेपर फोडण्याचा प्रयत्न केला असेलही; मात्र शाळेतील परीक्षा केंद्रात कोचिंग क्लासचे शिक्षक दहावीच्या परीक्षेचे पेपर पोहोचवत नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवरील ‘टॉपर’ ग्रुपमध्ये पेपर व्हायरल करणारी प्रथम व्यक्ती कोण, त्यास पेपर कोणी दिले, विद्यार्थ्यांना केवळ पेपर पुरवले की, त्याची उत्तरेदेखील पुरवली, याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे, अशी मागणी पालकांनी केली आहे.‘भरारी पथकाचीही चौकशी करा’परीक्षेच्या काळात पेपर फुटू नये तसेच मुलांनी कॉपी करू नये म्हणून परीक्षा मंडळाने भरारी पथक नेमलेले असते. त्या भरारी पथकासदेखील पोलिसांनी अद्याप बाजूला ठेवले असून, केवळ कोचिंग क्लासकडे लक्ष दिल्याचे तपासात दिसून येत आहे. काल्हेरमधील मुलींकडे मोबाइलमध्ये पेपर दिसून आल्यानंतर शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात दोन दिवसांपासून पेपर फुटल्याची तक्रार केली आहे. तत्पूर्वी त्यांनी पोलिसांत तक्रार का केली नाही, असा प्रश्न पुढे आला आहे. या तक्रारी दाखल करण्याअगोदर पेपर फुटले नाहीत काय, याबाबतची माहिती व्हॉट््सअॅपवर परीक्षेपूर्वी पेपर व्हायरल करणाराच देऊ शकेल. त्यामुळे हे प्रकरण गुन्हे अन्वेषण शाखेकडे द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.
पेपरफुटीप्रकरणी भिवंडीत चौथा शिक्षक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 1:56 AM