मीरारोड - मीरारोड सह अन्य पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या अरुण शिंदे ह्याला साताऱ्याच्या गोडोली भागातून पोलिसांनी अटक केल्या नंतर मीरारोड पोलिसांच्या हवाली केले होते . ठाणे न्यायालयाने त्याला जेल कोठडी सुनावली असून दाखल गुन्ह्यात त्याची पत्नी आदिती सुद्धा आरोपी आहे.
मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क मधील ऍकॉर्ड क्रिस्टल मध्ये राहणाऱ्या अरुण शिंदे व पत्नी अदिती वर ४ गुन्हे मीरारोड पोलीस ठाण्यात सध्या दाखल आहेत . तर दोन गुन्हे निकाली निघाले आहेत . शिंदे ह्याने सानपाड्याच्या योगानंद गृहसंकुलात राहणाऱ्या निलेश बाणेकर ह्यांना म्हाडाच्या लॉटरीत फ्लॅट घेऊन देतो सांगून ९३ लाख ७८ हजार असे धनादेश व रोखीने उकळले होते . पण फ्लॅट नाही आणि पैसे हि परत न मिळाल्याने मार्च २०१८ मध्ये मीरारोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
त्याशिवाय २०१५ मध्ये २ तर २०१६ व २०१७ मध्ये प्रत्येकी १ असे विविध गुन्हे शिंदे वर दाखल आहेत . ह्या शिवाय रबाळे , जोगेश्वरी पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हे दाखल आहेत . अरुण शिंदे ह्याचा शोध पोलीस घेत होते . साताऱ्याच्या गोडोली भागात तो असल्याची माहिती मिळाल्या नंतर सातारा शहर पोलिसांच्या सहकार्याने त्याला पकडण्यात आले. साताराचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला पकडल्या नंतर मीरारोड पोलिसांच्या ताब्यात २५ जानेवारी रोजी दिले . वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह बागल यांच्या मार्गदर्शना खाली अटक शिंदे ह्याची कसून चौकशी करण्यात आली . त्याला शनिवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती . शनिवारी ठाणे न्यायालयाने त्याची रवानगी जेल कोठडीत केली आहे . अदिती हिला आधीच अटक झालेली आहे .