उल्हासनगर : कॅम्प नं-४ मुख्य मार्केटमधील सियाराम नावाच्या दुकानात ब्रॅण्डेड कपड्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी लाखो रुपयांचे कपडे जप्त केले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, मुख्य मार्केटमधील शासकीय प्रसूतिगृह रुग्णालयासमोरील सियाराम नावाच्या एका दुकानात ब्रॅण्डेड कंपनीच्या कपड्याची विक्री केली जात होती, अशी माहिती अँटीपायरसी सेलला मिळाली होती. त्यानुसार अँटीपायरसी सेलने स्थानिक विठ्ठलवाडी पोलिसांच्या मदतीने मंगळवारी दुकानावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दुकानातून लाखो रुपयांचा कपड्यांचा साठा जप्त केला असून, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दुकानमालक भीमाशंकर चिंचोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात विविध नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्राॅनिक वस्तूंच्या नकलीचे गुन्हे यापूर्वीही दाखल झाले आहेत.
सियाराम दुकानातून अनेक नेते, प्रतिष्ठित व्यक्ती कपडे खरेदी करतात. या दुकानमालकाने लबाडीने सियाराम कंपनीचा लोगो वापरून नागरिकांची फसवणूक केल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस कन्हैया थोरात यांनी दिली. दुकानातून साडेतीन लाखांचे सियाराम कंपनीचे लोगो असलेले शर्ट, पॅन्ट जप्त करण्यात आले आहेत. दुकानाच्या पहिल्या मजल्यावरच कपडे शिवण्याचचे काम २० ते २५ टेलर करीत असल्याचे यावेळी उघड झाले.