नवीन पनवेल - रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपये घेऊन बनावट जॉयनिंग लेटर आणि ओळखपत्रे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी प्रियांका ऊर्फ पिंकी जाधव (राहणार संभाजी चौक, लालचक्की स्टेशन रोड, उल्हासनगर) हिच्याविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे बुधवारी पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे या प्रकरणात सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी केल्याने यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अमेय अनिल घाग हे सेक्टर २१, जुईनगर येथे राहतात. ते सरकारी नोकरीच्या शोधात होते. त्यांना पिंकी ऊर्फ प्रियंका मनोहर जाधव हिचे रेल्वेतील अधिकाऱ्यांंशी ओळख असून, अनेक लोकांना नोकरीस लावले आहे असे समजले. यानंतर पिंकीने रेल्वेत क्लार्कची नोकरी लावते यासाठी दहा लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून त्यांच्याकडून कागदपत्र घेतले. यानंतर त्यांनी पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये व्हॉट्सॲपवर रेल्वेचे लेटरहेड त्यावर रिपोर्टिंग लेटर पाठवले. यावेळी रेल्वेत नोकरी लागणार असल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी उरलेले पैसे पाठवले.
सेंट जॉर्जेसमध्ये वैद्यकीय चाचणीऑफर लेट दिल्यानंतर संबंधिताची सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली. काही दिवसांनी पिंकी यांनी रेल्वे विभागाचे ओळखपत्र, कमर्शियल क्लार्क लिहिलेले व सही शिक्का असलेले ओळखपत्र दिले. ऑगस्ट २०२३ मध्ये अमेय लोकलने जात असताना कोपरखैरणे येथे टीसीने त्यांना अडवून तिकिटाबाबत विचारणा केली. त्यावेळी रेल्वेचे ओळखपत्र दाखवले. ते बनावट असल्याचे सांगून टीसीने दंड आकारला आणि वाशी लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी जबाब नोंदवला. यावेळी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न दिल्याने अखेर प्रियंका ऊर्फ पिंकी जाधव हिने नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत त्यांनी २९ जानेवारी रोजी पोलिसांत गुन्हा नोंदविला.