ठाणे :
बंगला बांधून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील पाच जणांची एक कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला. कापूरबावडी पोलिसांनी दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
विलेपार्ले येथे राहणारे सुनील बांदेकर (६०) यांना नागाव येथे घर बांधायचे होते. २०१८ मध्ये एका वृत्तपत्रात बंगला बांधून देणाऱ्या एका कंपनीची जाहिरात दिसली. त्यानुसार ठाण्यातील कंपनीच्या ऑफिसमध्ये ते गेले. रॅंरो ट्रेडिंग कॉर्पोरेशन एलएलपी ही कंपनी त्यांच्या द कॉस्मो होम या ब्रॅण्डने बांधकाम व्यवसाय करीत असल्याचे त्यांना समजले. त्यांचे ऑफिस कापूरबावडी येथे असून, तिथे बांदेकर यांचा परिचय सुदिन शिंदे, त्यांची पत्नी जान्हवी आणि बहीण सायली शिंदे यांच्याशी झाला. आपण रॅंरो ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे भागीदार असल्याचे सांगितले. १४०० रुपये प्रती चौरस फूट दराने बांधकामाचे ठरल्यानंतर १५ जानेवारी २०१९ रोजी ५ लाखांचा धनादेश दिला; मात्र नंतर आरोपींनी प्लॅन दिला, ना बांधकाम केले, असा आरोप त्यांनी केला.