उल्हासनगर : मुंबई येथील एका कंपनीत नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून हिरू पुरस्वानी या तरुणांची साडे तीन लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विपीन रमाकांत निकम व राज उदय भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथे राहणारा तरुण हिरू जवाहरलाल पूरस्वानी व नाशिक येथे राहणारा विपीन रमाकांत निकम हे मित्र आहेत. हिरू पुरस्वानी याला मुंबई येथील एअर बोर्ण कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष मित्र विपीन निकम याचा मित्र राज उदय भालेराव याने दाखविले. यासाठी विपीन निकम याने सुरवातीला ५० हजार रोख रक्कम घेतले. त्यानंतर भालेराव याच्या नाशिक येथील बँक ऑफ इंडिया या शाखेतील बँक खात्यात आरटीजीएसने ३ लाख रुपये दिले. साडे तीन लाख रुपये घेऊन जून २०२१ पासून नोकरी लावण्याचा व्यवहार या तिघात सुरू होता. तीन वर्षे उलटूनही नोकरी लावली नसल्याने, आपली फसवणूक झाल्याचे हिरू पुरस्वानी यांच्या लक्षात आले. त्याने मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी विपीन निकम व राज भालेराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत आहेत.