ठाणे : वैयक्तिक माहिती (केवायसी) अद्ययावत करण्याच्या नावाखाली कोपरी येथील हेमा खेमनानी (३८) या महिलेच्या बँक खात्यातून दोन लाखांची रक्कम परस्पर काढून तिची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. खासगी नोकरी करणारी ही महिला कोपरी परिसरात वास्तव्याला आहे. तुमच्या बँक खात्याची केवायसी करायचे आहे, त्यासाठी मोबाइलद्वारे देण्यात आलेली एक लिंक डाउनलोड करा, असा फोन हेमा यांना २६ सप्टेंबर २०२० रोजी आला. बँकेतूनच फोन आल्याचे त्यांना वाटल्यामुळे त्यांनी ती लिंकही डाउनलोड केली. ती डाउनलोड केल्यानंतर एका सॉफ्टवेअरच्या मार्फतीने हेमा यांच्या मोबाइलचा संबंधित भामट्याने ताबा घेतला. त्याच काळात त्यांच्याकडून ओटीपी क्रमांकही घेण्यात आला. हेमा यांच्या मोबाइलच्या आधाराने या भामट्याने त्यांचे दोन लाख रुपये टप्प्याटप्प्याने आॅनलाइन परस्पर काढून घेतले.
आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीबाबतचा अर्ज दिला. दहिसरच्या ज्या बँकेच्या खात्यात हे पैसे वळते झाले, त्या खातेदाराकडे पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा ‘तुमचे एटीएम बंद होणार आहे’, असा आरबीएल बँकेतून फोन आल्याने या खातेदाराने ओटीपी दिल्यानंतर त्याच्या खात्यात ते पैसे जमा झाले होते. परंतु, नंतर संबंधित भामट्याने फोन क्रमांक बदलून ते पैसे काढून घेतल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात हेमा यांनी २७ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.बँक कधीही ओटीपीसाठी खातेदाराला फोन करीत नाही. त्यामुळे ओटीपी कोणीही कोणत्याही कारणासाठी देऊ नये. फोनवर आलेली कोणतीही लिंक डाउनलोड करू नये. एखादी वस्तू विक्रीचे प्रलोभन दाखविले तरी आगाऊ पेमेंट करण्यात येऊ नये.- दत्ता गावडे, पोलीस निरीक्षक, कोपरी पोलीस स्टेशन