लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: व्हेनेझुएला येथील एका वित्तीय कंपनीतून १५ लाख युरो अर्थात भारतीय चलनातील ११ कोटी रुपयांचे कर्ज काढून देण्याच्या नावाखाली २२ लाखांची फसवणूक करणाºया अविनाश जाधव आणि सपना जाधव या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.महागिरी कोळीवाडा येथील रहिवाशी अशोक जाधव (५५) यांचा रियल इस्टेट सल्लागार म्हणून व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा अक्षय हा इभियंता असून तो बांधकामाची कामे करतो. त्यांना त्याच्या बांधकाम व्यवसायासाठी काही रकमेची आवश्यकता होती. दरम्यान, अशोक जाधव यांची अविनाश जाधव (रा. दोस्ती कॉम्पलेक्स, वर्तकनर, ठाणे) यांच्याशी ओळख झाली. आपल्याला बांधकाम व्यवसायासाठी मोठया रकमेची गरज असल्याचे अशोक यांनी अविनाशला सांगितले. तेंव्हा त्याने व्हेनेझुवेला येथील ‘वॉको सेंन्टर आॅफ व्हेनेझुव्हेला’ या परदेशी वित्तीय संस्थेतून ११ कोटींचे (१५ लाख, युरो) चे कर्ज काढून देतो, असे त्यांना अमिष दाखविले. अविनाशने सपना जाधव, किरण चाफेकर आणि राधिका चाफेकर यांच्या मदतीने अशोक यांचा विश्वास संपादन केला. हे कर्ज मिळवून देण्यासाठी २२ लाखांची रक्कम विविध शुल्कापोटी भरावी लागेल, असेही त्यांनी भासविले. आपल्याला कर्ज मिळेल, या आशेपोटी अशोक जाधव यांनीही अविनाश आणि त्याच्या साथीदारांना १५ नोव्हेंबर २०१८ ते २१ मार्च २०२० या दोन वर्षांच्या कालावधीत ठाण्यातील जांभळी नाका येथील एका हॉटेलमध्ये तसेच सेंट जॉन हायस्कूल समोरील अविनाश जाधव यांच्या कार्यालयात रोख तसेच धनादेशाद्वारे २२ लाखांची रक्कम दिली. मात्र, अविनाश जाधव आणि त्याच्या साथीदारांनी कोणतेही कर्ज काढून न देता अशोक यांना बनावट एमबीएलसी (स्टँड बाय लेटर आॅफ क्रेडीटस्) या नावाच्या खोटया कंपनीचे कागदपत्रे बनवून २२ लाखांचा अपहार केला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात आधी तक्रार अर्ज दाखल झाला होता. याच अर्जाची चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. त्यानंतर २१ मार्च २०२० रोजी याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने ठाण्याच्या वर्तकनगर येथून १७ सप्टेंबर २०२० रोजी अविनाश आणि सपना जाधव या दोघांना अटक केली आहे. त्यांना १८ ते २२ सप्टेंबर अशी पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. २३ सप्टेंबर पासून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्या अन्यही साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.