मुरबाड : हाॅटेल मालक रामभाऊ बांगर यांची हॉटेलचा व्यवस्थापक सुधाकर शेट्टी याने फसवणूक केली आहे. हाॅटेलचे बनावट खाते उघडून शेट्टी याने बांगर यांची सुमारे ३६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरबाडमधील हाॅटेल रामकृष्णचे मालक रामभाऊ बांगर यांनी हाॅटेल सुरळीत चालण्यासाठी सुधाकर शेट्टी या इसमाला मॅनेजर म्हणून ठेवले होते. त्याला या व्यवसायाची अधिक माहिती झाल्यामुळे बांगर यांनी त्याच्याकडून अनामत रक्कम घेऊन त्याला संपूर्ण हाॅटेल भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिले. बांगर हे कधीतरी हाॅटेलमध्ये येत असत. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने हाॅटेल व्यवसाय बंद ठेवला होता. त्यावेळी आपले मासिक भाडे मिळत नसले तरी लाईट बिल, पाणी बिल व इतर कर भरण्याची हमी घेतलेला सुधाकर शेट्टी याने हे कर थकविले. त्याची वसुली करण्यासाठी नेहमीच अधिकारी बांगर यांना जाब विचारू लागले. त्यांनी शेट्टी याला फोन करुन विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. काही दिवसांनी बांगर यांनी हॉटेल उघडले असता त्यांना कचऱ्याच्या डब्यात हाॅटेलच्या नावे महाराष्ट्र बॅंकेत खाते असलेला एक चेक आढळून आला. तपासणी केली असता तो चेक व आपल्या चेकमध्ये तफावत आढळून आली. त्यांनी बॅंकेत चौकशी केली असता हे खाते सुधाकर शेट्टी यांनी हाॅटेल रामकृष्ण यांचे नावे उघडले असून, त्यामध्ये सुमारे ३६ लाख रुपयांची उलाढाल केली आहे, असे बॅंक मॅनेजरने सांगितले. त्यामुळे बांगर यांनी झालेला गैरप्रकार पोलीस ठाण्यात सांगितला. चौकशी करून सुधाकर शेट्टीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे तसेच बनावट शिक्के तयार करुन बांगर यांची फसवणूक केल्याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.