लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: जादा व्याजाच्या अमिषाने चिटफंडमध्ये मोठया रकमा तीन वर्षांसाठी गुंतवणूक करुन ठाण्यातील गुंतवणूकदारांची सुमारे ८० लाखांची फसवणूक करणा-या मनोज आणि त्याची पत्नी मोनिका पवार या दाम्पत्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या दाम्पत्याने आतापर्यंत ४३ जणांची फसवणूक केल्याचे चौकशीत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नौपाडा परिसरात राहणाºया निर्मला निलेश राजपूत (४७, रा. बी केबिन, नौपाडा, ठाणे) यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ६ आॅक्टोंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार मनोज पवार (४५) आणि त्याची पत्नी मोनिका पवार (४०, दोघेही रा. बी केबिन, नौपाडा, ठाणे) यांनी राजपूत यांच्यासह त्याच परिसरातील ४३ जणांना जादा परतावा देण्याचे अमिष दाखवित तीन वर्षांच्या कालावधीसाठी चिटफंडमध्ये गुंतवणूकीचे अमिष दाखविले. राजपूत यांनी त्यांच्याकडे सुरुवातीला २० सप्टेंबर २०१९ रोजी पाच लाख रुपये गुंतविले. त्याचे दोन टक्के दराने परतावा मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून त्यांनी आणखी दोन लाखांची रक्कम तीन वर्षांच्या कालावधीसाठी घेतली. या प्रकारामध्ये तीन वर्षांत कधीही क्रमांक लागल्यावर पैसे दुपटीने परत मिळतील, असे राजपूत यांच्यासह गुंतवणूकदारांना सांगण्यात आले. प्रत्यक्षात त्यांनी असे कोणालाही पैसे परत केले नाही. राजपूत यांच्यासह ४३ जणांची ८० लाख ३५ हजार ५०० रुपयांचा अपहार करुन फसवणूक केल्याचे उघड झाल्याने अखेर याप्रकरणी सर्व गुंतवणूकदारांनी नौपाडा पोलीस ठाण्यात एकत्र येत कलम ४२०, ४०६, ३४ तसेच एमपीआयडी कलम ३ आणि ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या दाम्पत्याने गेल्या २० वर्षांपासून अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचीही बाब समोर आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडीक हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.