ठाणे : कांदाखरेदीत मोठा फायदा होईल. स्वस्त दराने त्याची खरेदी करून तो चढ्या दराने विकता येईल, असे आमिष दाखवून दोन कोटी २६ लाख २७ हजारांची फसवणूक करणाऱ्या हरीश कारवा आणि योगेश शहा यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला.पाचपाखाडी येथील सोनू कार्गो मूव्हर्स प्रा.लि. या कंपनीत हरीश कारवा हा महाव्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. योगेश शहा याच्यासोबत कांदाविक्रीच्या व्यवसायात भरपूर फायदा आहे. स्वस्त दरात कांदाखरेदी करून नंतर वाढेल त्या भावाने तो बाजारात आणून त्याची विक्री करू, असे आमिष या मूव्हर्सचे संचालक अशोक चौधरी यांना हरीशने दाखवले. ठरल्याप्रमाणे मध्य प्रदेश सरकारच्या लिलावाद्वारे कांदाखरेदी करण्यासाठी संचालक मंडळाने योगेश शहा याला मे. सनशाइन लॉजिस्टिक या नावाने व्यवसाय करण्याचा अधिकार दिला. त्याचा गैरफायदा घेऊन योगेशने मध्य प्रदेशातील देवास येथे १२ जुलै २०१७ रोजी दोन कोटी २६ लाख २७ हजारांची रक्कम सोनू कार्गोकडून मिळवली. नंतर शेकडो टन कांदा सडलेल्याचे भासवून हरीश आणि योगेश यांनी त्याची २० मार्च २०१८ रोजी परस्पर विक्री करून पैसे लाटले.
कांदाखरेदीच्या नावाखाली सव्वादोन कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 3:22 AM