ठाणे : महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणार असल्याने शहराच्या विविध भागात या योजनेचे कार्ड बनवून देण्यासाठी कॅम्प लावले जात आहेत. परंतु या कॅम्पच्या आड गोरगरीब जनतेची लुट सुरु असल्याचा धक्कादायक आरोप मंगळवारी झालेल्या महासभेत स्थायी समितीचे सभापती राम रेपाळे यांनी केला आहे. या योजनेसाठी केवळ रेशनिंग कार्ड आवश्यक असून ते असल्यास मोफत उपचार होतात. मात्र असे असतांनाही नव्याने कार्ड बनवून देण्याच्या नावाखाली काही संस्था ५०० ते ७५० रुपये आकारत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे योजनेची माहिती लोकप्रतिनिधींना देखील असणो गरजेचे आहे. परंतु त्यांना देखील याची माहिती नसल्याने त्यांचे अज्ञानही या निमित्ताने उघड झाले आहे.
दरम्यान या संदर्भात पालिका प्रशासनाने खुलासा करुन ठाणेकरांची जी लुट संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे, ती तत्काळ थांबवावी असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले. कोरोनावर उपचार करणे गोरगरीब जनतेला शक्य होत नाही, त्यामुळे केंद्र सरकाराने त्यासाठी महात्मा फुले आरोग्य योजना पुढे आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. परंतु त्याला मुठमाती देत ठाण्यात विविध ठिकाणी काही सामाजिक संस्था या योजनेसाठी लागणारे कार्ड देण्यासाठी कॅम्प लावत आहेत. तसेच यासाठी विविध कागदपत्रंची पुर्तात करण्यासाठी सांगून नागरीकांकडून ५०० ते ७५० रुपयांर्पयची रक्कम लुटत असल्याची माहिती रेपाळे यांनी महासभेत उघड केली. वास्तविक पाहता ही योजना मोफत असून त्यासाठी कोणत्याही स्वरुपाचे पुरावे लागत नाहीत, केवळ तुमच्याकडे रेशनिंग कार्ड असेल तरी त्या आधारावर उपचार होत आहेत, तसेच आधार कार्ड असल्यास ते देखील पुरेसे असते. परंतु ठाणेकर नागरीकांची फसवणुक करुन लुट सुरु असून अशा संस्थावर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे अशा स्वरुपाच्या कॅम्प लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागांमध्ये देखील लावत आहेत. परंतु या योजनेसाठी काय काय पुरावे लागतात, योजनेसाठी मुळात रेशनिंग कार्ड असणे गरजेचे मानले जात आहे. परंतु याचेही ज्ञान काही नगरसेवकांना नसल्याचेच या निमित्ताने दिसून आले. दुसरीकडे या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी देखील महापालिका प्रशासनाला या संदर्भातील खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु काही समाजसेवेच्या नावाखाली काही संस्था गोरगरीब जनतेची लुट करुन स्वत:ची घरे भरत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. नागरीकांनी या भुलथापांना बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले. तर अशा प्रकारचे उद्योग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले.