लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांचे दागिने लुबाडणाऱ्या टोळीतील रफीकुल शेख (४८, रा. धारावी, मुंबई) यास नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी शुक्रवारी दिली. त्याच्याकडून २७ लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. यातील मुख्य सूत्रधाराचाही शोध घेण्यात येत आहे.
नौपाड्यातील रहिवासी अमोद चाचड यांनी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी ३२ लाख ८० हजारांचे ७६२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी कारागीर राजा शेख याच्याकडे दिले होते. गेल्या अनेक दिवसांपासून तो याच परिसरातील नागरिकांचे सोन्याचे दागिने पॉलिश करून देत असल्यामुळे त्याच्यावर या भागातील रहिवाशांचा विश्वास होता. या वेळी मात्र त्याने दागिन्यांना पॉलिश करण्याऐवजी त्यांचा अपहार करून तो पसार झाला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात २५ फेब्रुवारी रोजी चाचड यांनी ४०६ प्रमाणे तक्रार दाखल केली होती. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाचे आदेश दिले होते. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने शेख याने धारावीमध्ये रफीकुल याला केलेल्या एका कॉलच्या आधारावर तसेच एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर त्याची चौकशी केली. सुरुवातीला आपल्याला यातले काहीच माहिती नाही, असे सांगणाऱ्या रफिकुल याने नंतर मात्र हे दागिने राजाने ठेवण्यासाठी दिल्याची कबुली दिली. त्यानंतर ५ मार्च २०२१ रोजी रफिकुल याला त्याच्या धारावीतील घरातून नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून या अपहारातील २७ लाख ५५ हजारांचे ६४४.४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. यातील मुख्य सूत्रधार राजा शेख आणि त्याच्याकडील उर्वरित पाच लाखांच्या दागिन्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.