उल्हासनगर : लॉटरी सीस्टिमद्वारे जास्त नफा व चांगल्या परताव्याचे प्रलाेभन दाखवून, एका महिलेला २८ लाख रुपये राेख आणि ४५ ताेळ्यांच्या दागिने लाटून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी उल्हासनगर येथील पूजा सहाेता या महिलेवर मध्यवर्ती पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं. ३ फॉरवर्ड लाइन परिसरात राहणाऱ्या पूजा सुरिंदर सहोता या महिलेच्या प्रलाेभनाला बळी पडून, कल्याण तालुक्यातील चिकणघर येथे राहणाऱ्या उर्मिला भेरे यांनी लॉटरी सीस्टिममध्ये फेब्रुवारी ते डिसेंबर, २०१८ या कालावधीत रोख रक्कम व सोन्याचे दागिने गुंतविले. सुरुवातीला सहोता हिने विश्वास संपादन करण्यासाठी दाेन लाख ९० हजार रोख स्वरूपात परत दिले. मात्र, त्यानंतर ठरल्याप्रमाणे दोन वर्षांत रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत केले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, भेरे यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन २८ लाख रुपये व ४५ तोळे सोन्याचे दागिन्यांचा अपहार व फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, आणखी किती लोकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे का, याबाबत पाेलीस तपास करत आहेत. त्यातून मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.