ठाणे : घरकाम करणार्या दोन मुलांच्या आईला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक करणार्या अहमदनगरच्या एका युवकास नौपाडा पोलिसांनी अटक केली. मोटारसायकलची हौस भागविण्यासाठी त्याने महिलेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.ठाण्यातील खोपट येथील भाजीवाला चाळीत राहणारी ३२ वर्षीय महिला लोकांकडे घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. तिला दोन मुले असून, तिचा पती मुरबाड येथे वेगळा राहतो. ती मखमली तलावजवळ राहणार्या एका कुटुंबाकडे घरकामाला जायची. याच भागातील एका सोसायटीतील इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवासी असलेला आरोपी मनोज वाघमारे उर्फ मनोहर किसन वाघमारे हा टिटवाळ्यातील हरीओम व्हॅलीमध्ये वास्तव्यास असून, मखमली तलावाजवळील इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामावर तो पर्यवेक्षक म्हणून काम करतो. एकाच भागात काम करताना आरोपी मनोज आणि पीडित महिलेची नोव्हेंबर २0१७ मध्ये ओळख झाली. हळुहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. लग्न करून आपण सुखात जिवन जगू, असे स्वप्न आरोपीने पीडित महिलेला दाखविले. दोघांच्या भावी आयुष्यासाठी लहानसे घर विकत घेऊ, असेही आरोपीने तिला सांगितले. त्यासासाठी काही पैसे मी देतो, काही तु जमव असे आरोपीने तिला सांगितले. आरोपीच्या भूलथापांना बळी पडून पीडित महिलेने २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २0१७ या काळात थोडे-थोडे करून आरोपीला एक लाख २0 हजार रुपये दिले. पीडित महिलेने थोडे-थोडे करून साठवलेले पैसे मनोजला दिले. एवढेच नव्हे तर स्वत:चे दागिने गहाण ठेऊन आलेला पैसाही आरोपीला दिला. आरोपीने मात्र हा पैसा घरासाठी नव्हे तर मोटारसायकल विकत घेण्यासाठी वापरला. दरम्यानच्या काळात महिलेचे दागिने घरात नसल्याचे तिच्या कुटुंबियांना समजले. त्यांनी विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. पीडित महिलेने रविवारी याप्रकरणी नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एच.जी. ओऊळकर यांनी गुन्हा दाखल करून आरोपी मनोज वाघमारेला अटक केली. त्याला १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मोटारसायकलची हौस भागविण्यासाठी घरकाम करणार्या ठाण्यातील महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 6:15 PM
मोटारसायकलची हौस भागविण्यासाठी अहमदनगरच्या एका युवकाने ठाण्यातील एका विवाहित महिलेची फसवणूक केली. ही महिला दोन मुलांची आई असून, आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ठळक मुद्देपीडित महिला दोन मुलांची आईआरोपी युवक अहमदनगरचालग्नाचे आमिष दाखविले