लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बांधकाम व्यवसायात जादा परताव्याच्या योजनांचे आमिष दाखवून ठाणे आणि उल्हासनगरच्या ४३ गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटी ५४ लाख ५० हजारांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार मनमोहन दिलीपसिंग आयलिसंगांनी (रा. उल्हासनगर) याला ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी रविवारी दिली.उल्हासनगर येथे सद्गुुरू डेव्हलपर्स आणि त्यांचे भागीदार सुंदर एस बजाज, लाल एस. बजाज, हिरासिंग आयलिसंगानी, मनमोहन आयलिसंगानी, फेरू पी. लुल्ला, नंदलाल पी. लुल्ला तसेच एजंट , गोबिंद मनचंदा आणि ओम मनचंदा या आठ जणांनी आपसात संगनमत करून बांधकाम व्यवसायात पैसे गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, अशा योजनांचे आमिष दाखविले. ही योजना सुरू करण्यापूर्वीच गुुंतवणूक करणाऱ्यांना आकर्षक परताव्याचे प्रलोभन दाखविले. २०१५ पासून सुरू झालेल्या या योजनेत काही गुंतवणूकदारांना सुरुवातीच्या एक ते दीड वर्षात बऱ्यापैकी परतावाही दिला. मात्र, २०१७ पासून तो देण्याचे बंद झाले. वारंवार मागणी करूनही गुंतवणूकदारांना पैसे दिले जात नव्हते. आमिषाला बळी पडून ४३ गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटी ५४ लाख ५० हजारांची रक्कम गुंतविल्याचे समोर आले. आपले पैसे परत न मिळाल्याने त्यांनी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी उल्हासनगर येथील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सूत्रधार मनमोहन याच्यासह सर्वच पसार झाले. तर मनमोहन हा दोन महिन्यांपूर्वी परदेशात पसार झाला होता. त्याच्या विरोधात २६ नोव्हेंबर २०२१ रोजी ठाणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस बजावली होती. तो १२ जानेवारी २०२२ रोजी दुबईतून परतल्यानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतला. त्याचवेळी इमिग्रेशन विभागाने त्याला ताब्यात घेतले. ही माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे, सहायक पोलीस आयुक्त अरविंद वढाणकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पन्हाळे यांच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्या अन्यही साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची साडेपाच कोटींची फसवणूक करणाऱ्या ठकसेनाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 10:52 PM
बांधकाम व्यवसायात जादा परताव्याच्या योजनांचे आमिष दाखवून ठाणे आणि उल्हासनगरच्या ४३ गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटी ५४ लाख ५० हजारांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार मनमोहन दिलीपसिंग आयलिसंगांनी (रा. उल्हासनगर) याला ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.
ठळक मुद्देठाणे, उल्हासनगरच्या ४३ जणांना गंडा ठाणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई