ठाणे : कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी १००हून अधिक मोफत बसेस मनसे सोडणार आहे. त्याचा श्रीगणेशा बुधवारी रात्री ठाणे महापालिका येथून करण्यात आला. पहिल्या टप्प्यात मनसेने ४७, दुसऱ्या टप्प्यात ३९, तर गुरुवारी उर्वरित बसेस सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाताना ठाणे शहरातील चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मनसेने गेल्यावर्षी ५४ बसेस सोडल्या होत्या. यंदा १०० हून अधिक मोफत बसेस ७, ८ आणि ९ सप्टेंबर या कालावधीत सोडल्या जात आहेत. यावर्षी चाकरमान्यांना कोकणाची लागलेली ओढ पाहता ठाणे ते सावंतवाडी याठिकाणी बसेस सोडल्या जात आहेत. कोकणवासीयांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रत्येकाला कोकणात जाण्यासाठी रेल्वेत आरक्षण मिळतेच असे नाही. त्यातच कोरोनामुळे आर्थिक संकट कोसळल्याने अनेकांना खासगी वाहनांतून प्रवास परवडणारा नाही. यासाठी मनसेने हा निर्णय घेतला आहे आणि पुढील वर्षीही बसेस सोडल्या जातील, असे जाधव म्हणाले.